
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर परदेशात देशाची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. सतत निवडणूक हरल्यानंतर त्यांच्या वक्तव्यातून निराशा दिसून येते, असे फडणवीस म्हणाले.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टनमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी सातत्याने परदेशात जाऊन भारताची, भारतीय लोकशाहीची आणि संविधानिक संस्थांची बदनामी करीत आहेत. या प्रकारामुळे देशाची मान शरमेने झुकत असून हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे.

फडणवीसांनी स्पष्ट केले की, निवडणुकीमध्ये सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे राहुल गांधींच्या मनावर परिणाम झाला व ते विचलित झाले आहेत. त्यामुळेच ते भारतात पराभूत झाल्यावर परदेशात जाऊन देशाच्या सार्वभौमत्वावर, निवडणूक प्रक्रियेवर आणि लोकशाही संस्थांवर संशय निर्माण करत आहेत.
प्रतिष्ठेवर प्रहार
राहुल गांधी यांनी बोस्टनमधील भाषणात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान 5.30 नंतर 65 लाख मतदारांनी मतदान केल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांनी मतदान प्रक्रियेची व्हिडीओग्राफी न करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याचा दाखला देत, थेट आयोगावर तडजोडीचे आरोप लावले. यावर फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही भूमिका भारताच्या लोकशाही संस्थांवर अविश्वास दर्शवणारी आहे, असे सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांच्याकडून देशाचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा आहे. मात्र त्यांनी ज्या प्रकारे भारताविरोधात परदेशात वक्तव्यं केली, ती भारताच्या शत्रूंनाही लाजवणारी आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण होतो.
देशप्रेम दाखवण्याची गरज
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली या राज्यांत झालेल्या पराभवांनंतर राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याऐवजी त्यांनी जनतेत जाऊन विश्वासार्हता निर्माण करावी, जनतेची सेवा करावी, हेच खरे नेतृत्वाचे लक्षण आहे. निवडणूक हरल्याने विदेशात फिरून देशाची बदनामी केली, तरी जनतेचे मत वाढणार नाही.
Hamid Engineer : नागपूर दंगलीतला प्रमुख चेहरा जामिनावर बाहेर
खरा देशभक्त परदेशात जाऊन देशाची बदनामी करत नाही. भारताच्या संस्थांबद्दल खोटं बोलणं म्हणजे भारताच्या आत्म्यालाच दूषणे देण्यासारखं आहे. राहुल गांधी यांनी म्हणूनच अशा वक्तव्यांना पूर्णविराम द्यावा, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे मांडलं.
फडणवीसांनी स्पष्ट केले की, निवडणूक विजयासाठी केवळ भाषणं किंवा आरोप उपयोगाचे ठरत नाहीत. जनतेच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणं हेच खरे राजकारण आहे. राहुल गांधींनी सततच्या पराभवांवर चिंतन करून, देशाबद्दल आदर ठेवूनच आपली भूमिका ठरवावी, हेच देशहिताचे आहे. भारताच्या प्रतिष्ठेला गालबोट लावणारे हे वक्तव्य कोणत्याही जबाबदार नेत्याला शोभणारे नाही.