
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या अफवांची फॅक्टरी, या आरोपाला आज सडेतोड उत्तर दिलं. त्रिभाषा सूत्र, मराठी अस्मिता आणि मुंबईच्या भविष्यावर फडणवीसांनी ठाम भूमिका मांडली.
महाराष्ट्रातल्या त्रिभाषा सूत्रातील हिंदी वा अन्य भाषा शिकण्यासंबंधीचे दोन शासन आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 29 जूनच्या संध्याकाळी मागे घेतले. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला ‘अफवांची फॅक्टरी’ म्हणत जोरदार टीका केली होती. या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अत्यंत आक्रमक भाषण करत, ठाकरेंवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजूनही सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अशा बनावट प्रचाराच्या माध्यमातून यश मिळवलं, पण विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्या त्या नरेटिव्हला थेट उत्तर दिलं. आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नव्या थापांचे वारे वाहू लागले आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा अजेंडा पुन्हा पुढे रेटला जात आहे, मात्र त्यात कोणालाही यश मिळणार नाही.

गृहीत धरण्याचा आरोप
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाजपचं सरकार आल्यानंतर मुंबईचा चेहरामोहरा बदलून दाखवला. मात्र, शिवसेना पक्षाने मुंबई महानगरपालिकेला केवळ सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजून तिचा गैरवापर केला. गिरगावातल्या आणि चाळीतल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम शिवसेनेने केलं. मराठी माणसाच्या नावावर सातत्याने राजकारण करणाऱ्या ठाकरेंना निवडणुकीच्या काळातच मराठी माणूस आठवतो.
फडणवीस यांनी यावेळी मराठीसह हिंदी आणि अन्य भारतीय भाषांचा गौरव करत, भाषेच्या राजकारणावर जोरदार घणाघात केला. त्यांनी सांगितलं की, हिंदी अनिवार्य करण्याचा अहवाल उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातीलच आहे. ठाकरेंच्या सरकारने त्रिभाषा सूत्राबाबत समिती तयार केली होती. त्याच समितीने पहिली ते बारावीपर्यंत हिंदी अनिवार्य करण्याची शिफारस केली होती. त्या अहवालावर स्वाक्षरी करून त्या प्रस्तावाला त्यांच्या कॅबिनेटने मान्यता दिली होती.
फडणवीस म्हणाले की, भारतीय भाषांवर विरोध करायचा आणि इंग्रजीला पायघड्या घालायच्या, हे आमचं धोरण नाही. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकणाऱ्यांनी भारतीय भाषांवर टीका करू नये. आम्हाला हिंदीचाच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आहे. त्यांनी यावेळी जाहीर केलं की, राज्य सरकारने नवीन समिती तयार केली असून, मराठी विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतले जातील. कुठल्याही दबावाला बळी न पडता ठाम भूमिका घेतली जाईल.
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठी माणसाला घरे देण्याचे काम सुरू केले आहे. अभ्युदय नगर आणि बीडीडी चाळीतील रहिवाशांना घर देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. निवडणुकींच्या वेळेसच मराठी माणसाची आठवण होणाऱ्या पक्षांनी केवळ भावना भडकवण्याचं काम केलं.
Rajendra Mulak : जुनं प्रेम पुन्हा फुललं, राजकारणातही हृदय जुळलं
महायुतीची वचनबद्धता
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाबद्दलचा सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट करताना सांगितलं की, कुणाची युती किंवा अयुती व्हावी यासाठी आम्ही राजकारण करत नाही. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी राजकारण करतो. राज्यातील युवकांच्या हातात काम असावं, शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून आम्ही 16 लाख कोटींचे करार केले आहेत. देशातली थेट विदेशी गुंतवणूक सर्वाधिक महाराष्ट्रात आल्याचं यश आम्हाला मिळालं आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा कोणत्याही भागात दुष्काळ हा भूतकाळ ठरावा यासाठी आम्ही काम करत आहोत. मोठी भाषणं आणि कर्तृत्वशून्य वृत्ती आमच्यात नाही. पब्लिक सर्व काही ओळखते, असे शब्द फडणवीसांनी वापरत ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.
आज भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे भाषण करत महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मिळून नवा महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पनेसह एक विकसित महाराष्ट्र साकारण्याच्या दिशेने हे सरकार काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.