भारताच्या सीमांवर लढाई रणगर्जना करतेय, पण संसदेत विचारांच्या सीमारेषा ढासळताना दिसत आहेत. काँग्रेसवर पाक-समर्थक मानसिकतेचा आरोप करत मुख्यमंत्री फडणवीसांनी राजकीय रणभूमी पुन्हा तापवली आहे.
पाकिस्तानने फक्त काश्मीर व्यापलेला नाही, तर काँग्रेसची मानसिकताही हायजॅक केलेली आहे, असा घणाघात करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशाला खरा धोका पाकिस्तानकडून नाही, तर पाक विचारसरणीच्या काँग्रेसकडून आहे, असे सांगत त्यांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात तब्बल 713 कोटींहून अधिक रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर पाक-विचारधारेच्या संक्रमणाचा आरोप करत राजकीय वातावरण चांगलेच तापवले.
स्फोटक परिणाम
फडणवीस म्हणाले, पहलगाममध्ये अतिरेक्यांनी आपल्या 27 जवानांचा बळी घेतला, पण त्यानंतर भारताने फक्त दुःख व्यक्त न करता कारवाईचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 23 मिनिटांत पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. हा भारताचा नवीन आत्मविश्वास आणि आक्रमकतेचा परिचय आहे. या कारवाईत मसूद अजहर व हाफीज सईद यांच्या कुटुंबातील सदस्यांसह तब्बल 100 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला, अशी माहितीही त्यांनी दिली.
पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करत 500 पेक्षा जास्त ड्रोन पाठवले. पण आपल्या सैन्याने एकही ड्रोन जमिनीवर येऊ दिला नाही, असे सांगताना फडणवीस म्हणाले, मेड इन इंडिया अँटी-ड्रोन गनचा अभिमानाने उल्लेख करायला हवा. ही गन एकाचवेळी 64 ड्रोन पाडू शकते, आणि ती अमेरिकेकडेही नाही. हा भारताचा सामर्थ्याचा खणखणीत पुरावा आहे.
खरमरीत शब्दांत टीका
एक राहुल (राहुल आवाडे) अडीच किलोमीटरची तिरंगा यात्रा काढतो, तर दुसरा राहुल (राहुल गांधी) हल्ल्यावर संशय व्यक्त करतो. हेच काँग्रेसचे पाकप्रेम दर्शवते, असे म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार बोट ठेवलं. ते पुढे म्हणाले, ज्यांना युद्धात वापरण्यात येणारे क्षेपणास्त्र आणि शेतीसाठी वापरले जाणारे ड्रोन यामधला फरकही कळत नाही, त्या मूर्खांना समजावून सांगायचं तरी कसं?
आतापर्यंत आपण पाकव्याप्त काश्मीरबद्दल ऐकत होतो, पण आता काँग्रेसच्या वर्तनावरून ‘पाकव्याप्त काँग्रेस’ हेच अधिक भीतीदायक आहे, हे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानला जे प्रश्न विचारायचे होते, ते आता काँग्रेस विचारते, हे दुर्दैवी आहे, अशी तीव्र टीका फडणवीसांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ काँग्रेसवर टीका केली नाही, तर केंद्र सरकारच्या संरक्षण आणि राष्ट्रवाद धोरणांचे समर्थन करत भारतीय सैन्याच्या शौर्याचे उत्तम चित्रण केले. त्यांच्या भाषणाने सभा थरारली आणि जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.