महाराष्ट्र

Devendra Fadnavis : भगवा आतंकवाद म्हणणाऱ्यांची विचारमाळ भ्रष्ट 

Maharashtra : हिंदूंना बदनाम करणारं नॅरेटिव्ह पुराव्यांच्या धुळीत गाडलं

Author

मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘भगवा आतंकवाद’ म्हणणाऱ्या काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. भगवा म्हणजे राष्ट्रप्रेम, दहशतवाद नव्हे, असा ठाम संदेश दिला.

राजकारणात शब्दांचं वजन असतं. काही वेळा शब्द एखाद्या समाजाच्या अस्मितेवर घाव घालू शकतात. असाच एक शब्द, ‘भगवा आतंकवाद’ काँग्रेसने वापरला आणि त्यातून हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला असून, भगव्याचा अवमान करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने भगवा आतंकवाद किंवा हिंदू टेरर, अशा नॅरेटिव्हचा वापर करून हिंदू समाजाला संशयाच्या भोवऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. मालेगाव स्फोट प्रकरणाच्या निकालामुळे हे संपूर्ण कथानक कोसळून पडलं आहे. हा केवळ आरोप नव्हता, तर एका सांस्कृतिक परंपरेवर डाग लावण्याचा कट होता. ते पुढे म्हणाले, ज्यावेळी काँग्रेसने भगवा आतंकवादाचा प्रचार सुरू केला, त्यावेळी कोणालाही हे सुचलं नाही का की, हा भगवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यध्वज आहे?

Devendra Fadnavis : बेशिस्त मंत्र्यांचे देवभाऊ झाले डिसिप्लिन मास्टर

राष्ट्रप्रेमाचे प्रतीक 

फडणवीस यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीकेची तोफ डागली. चव्हाण यांनी ‘भगवा आतंकवाद’ न म्हणता ‘सनातनी आतंकवाद’, असा शब्द वापरला. पण ते त्याच मनमोहनसिंग सरकारचा भाग होते ज्यांनी हा अपमानकारक नॅरेटिव्ह तयार केला होता, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, भगवा, सनातन, हिंदू  हे सगळे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय विचारांचे प्रतीक आहेत. त्यांच्यात कुठलाही दहशतवाद शोधणे, हे फक्त काँग्रेसचं षड्यंत्र होतं.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, इस्लामिक टेररिझम ही संकल्पना भारतात निर्माण झालेली नव्हती, ती जागतिक पातळीवर निर्माण झाली होती. अमेरिकेत, युरोपमध्ये आणि भारतात जेव्हा मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले झाले, तेव्हा त्यामागे पाकिस्तानातील अतिरेकी संघटना असल्याचं उघड झालं होतं. पण काँग्रेसला हे वाटलं की, अशा नॅरेटिव्हमुळे त्यांच्या मतबँकेवर परिणाम होतो आहे, म्हणून त्यांनी हिंदूंना लक्ष्य केलं.

Congress : खोटारडेपणाचे ऑलिंपिक झाले, तर फडणवीसांना सुवर्णपदक मिळेल

मंत्र्यांना इशारा 

माणिकराव कोकाटे यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल फडणवीस यांनी सांगितलं की, त्यांच्या वर्तनामुळे जनतेत रोष होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या खात्याचा बदल करण्याचा निर्णय घेतला गेला. कृषी खाते आता मामा भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. मात्र, मंत्रिमंडळामध्ये सध्या अन्य कोणताही बदल होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना स्पष्ट इशारा दिला की, यापुढे कोणाचंही वर्तन जर समाजात नकारात्मक संदेश देणारं असेल, तर त्यावर कारवाई केली जाईल. जनतेच्या सेवेसाठी आपण सत्तेवर आलो आहोत. आपल्या वर्तनात, शब्दांत आणि कृतीत शिस्त असावी लागेल. कोणाचंही चुकीचं वागणं खपवून घेतलं जाणार नाही.

या वक्तव्यातून फडणवीसांनी केवळ राजकीय टीका केली नाही, तर भगव्याच्या अस्मितेवर झालेल्या आघाताला ठामपणे प्रत्युत्तर दिलं. भगवा म्हणजे केवळ एक रंग नव्हे, तो आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि राष्ट्रभक्तीचा गौरव आहे. राजकारणासाठी भगवा गढूळ करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, हा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!