
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पॉडकास्टमध्ये रामायण, महाभारत, बुद्ध आणि संतपरंपरेच्या कथा नव्या आवाजात गूंजल्या. महाराष्ट्राच्या मातीतील अध्यात्म, इतिहास आणि भक्तीचा थेट संवाद घडतो.
पंढरपूरच्या विठूमाऊलीच्या चरणांशी नतमस्तक होताच, महाराष्ट्राच्या मातीतील अध्यात्म, संघर्ष, भक्ती आणि समतेच्या सुगंधाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पॉडकास्ट सुरू होतो. आषाढी एकादशीच्या पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सपत्नीक पार पडल्यानंतर, ‘महाराष्ट्र पॉडकास्ट’च्या माध्यमातून फडणवीस यांनी राज्याच्या पौराणिक, ऐतिहासिक आणि भक्तीमय वारशाचे मंत्रमुग्ध करणारे शब्दचित्र उभे केले आहे. हा पॉडकास्ट केवळ भक्तिभावाने भरलेला नाही, तर महाराष्ट्राच्या भूमीला पौराणिक संदर्भांपासून संतपरंपरेपर्यंत आणि सामाजिक समतेपासून शौर्यगाथेपर्यंत एका वेगळ्याच भाषेत जोडणारा आहे.
महाभारताचा झरा विदर्भातून वाहतो
महाराष्ट्र का महाराष्ट्र आहे, हे समजून घ्यायचं असेल तर इतिहासात नव्हे तर पुराणांत उतरावं लागेल, असे सांगत फडणवीस रामायणातल्या भूगोलाचे दर्शन घडवतात. दंडकारण्याच्या गहन जंगलातून श्रीरामाचा वनवास, लक्ष्मणरेषेचा संघर्ष, सीतेचं हरण आणि धर्म-अधर्माचा संघर्ष, हे सारे काही आजच्या नाशिक व विदर्भातील भूमीत घडल्याचे ते अधोरेखित करतात. विदर्भ ही केवळ भौगोलिक ओळख नसून, ती महाभारतातील नायक-नायिकांच्या भावविश्वाची जन्मभूमी आहे, असं म्हणत त्यांनी दमयंतीच्या प्रेमकथेपासून अर्जुनाच्या ध्यानधारणेपर्यंत आणि रुख्मिणीच्या कृष्णाला लिहिलेल्या पत्रापर्यंत अनेक संदर्भ सांगितले. ही भूमी फक्त युद्धांची नाही तर प्रेम, त्याग आणि भक्तीच्या चरित्रांनी नटलेली आहे, असे ते म्हणाले.

संदेश अजिंठ्याच्या दगडांतून
गौतम बुद्धांचे विचार फक्त ऐकले नाहीत तर महाराष्ट्राच्या लेण्यांनी त्यांना दगडांत कोरून ठेवलं. “अजिंठा आणि वेरुळच्या गुहा या केवळ शिल्पकलेचे उदाहरण नाहीत, त्या मौनात बुद्धाच्या शब्दांचा प्रतिध्वनी आहे,” असे त्यांनी सूचक शब्दांत मांडले. ही शांतीची शिकवण आजही भिंतीतून डोकावते, असे ते नमूद करतात. कोल्हापूर म्हणजे केवळ एक शहर नाही, ती महालक्ष्मीच्या कृपाछत्राखाली नांदणारी ऊर्जा आहे, असे म्हणत फडणवीसांनी करवीर नगरीच्या आध्यात्मिक शक्तीकेंद्रावर प्रकाश टाकला. शंकराचार्यांनी स्थापन केलेले पीठ आणि त्या मातीतील दैवी महत्त्व हे महाराष्ट्राच्या उत्तर-दक्षिण संगमाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
भक्तीचे लोकशाहीकरण
वारी फक्त परंपरा नाही, ती समतेचा अविरत प्रवाह आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपासून मुक्ताबाईच्या ओव्यांपर्यंत, संत नामदेव, एकनाथ, चोखामेळा यांच्या अभंगांनी महाराष्ट्राच्या सामाजिक पृष्ठभूमीवर अमिट ठसा उमटवला. ही संत मंडळी तलवारीविना क्रांती घडवणारी होती. भक्तीच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या गाभ्याला स्पर्श केला, असा भावपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री फडणवीसांनी केला. वारी ही पंढरपूरकडे जाणारी यात्रा नसून, ती मानवतेच्या दिशेने चाललेली अध्यात्मिक चळवळ आहे. जातीभेदाच्या सीमांना ओलांडणारी, आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या गजरात एकरूप होणारी ही वारी, हीच खरी महाराष्ट्राची ओळख असल्याचे ते म्हणाले
मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा पॉडकास्ट राजकीय भाषणांपेक्षा वेगळा आहे. तो अध्यात्म, इतिहास, साहित्य, प्रेमकथा, बौद्धिक वारसा आणि सामाजिक न्याय अशा विविध अंगांनी भरलेला आहे. तो ‘राज्यशकटाचा आवाज’ न राहता, ‘मातीतून आलेल्या आवाजाचा प्रतिध्वनी’ वाटतो. या पॉडकास्टमधून महाराष्ट्र एक नवीन दृष्टिकोनातून समोर येतो, जो राजकीय भाषेपलीकडचा आहे, तो भावना, श्रद्धा आणि समर्पणातून साकारलेला आहे. महाराष्ट्राच्या मातीने रामायण, महाभारत, बुद्ध, संत, आणि समाजसुधारणेच्या चळवळी पाहिल्या. त्या सर्वाच्या गंधाने फुललेली ही भूमी, फक्त भूतकाळ नव्हे, तर भविष्यासाठीही दीपस्तंभ आहे.