महाराष्ट्र

Devendra Fadnavis : सत्तेच्या उंबरठ्यावरून आठवणींच्या अंगणात 

Amravati Visit : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच मामांच्या घरी 

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत, पण हा दौरा केवळ शासकीय नाही, तो भावनांचा संगम देखील आहे. लहानपणीच्या आठवणींना साक्षी ठरलेल्या मामाच्या घरात आज मुख्यमंत्री म्हणून त्यांची पहिलीच भेट जिव्हाळ्याची ठरत आहे.

अमरावती, विदर्भातील एक महत्त्वाचं शहर. परंतु आज या शहरात काही वेगळंच घडतंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या लाडक्या मामाच्या घरी पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात घालून आले आहेत. हे केवळ एक औपचारिक दौऱ्याचं निमित्त नाही, तर हा एका भावनिक नात्याचा, आठवणींच्या गर्दीत हरवलेल्या त्या लहानग्या ‘देवेंद्र’चा अमरावतीशी पुन्हा गडबडलेला सजीव संवाद आहे.

मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीत नवनिर्मित विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी आले आहेत. पण या दौऱ्याचं सर्वात जिव्हाळ्याचं कारण म्हणजे त्यांचा खासगी थांबा मामाच्या घरी. बालाजी प्लॉट येथील कलोती कुटुंबीयांचं घर, जे लहानपणीच्या अनेक उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांचं साक्षीदार आहे. आज मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी सजलंय. त्यांचा भावनिक स्वागतसोहळा सगळ्या अमरावतीकरांसाठी एक सोहळाच ठरला.

गौरवाचा क्षण

देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचे मामा, मामी, मामे भाऊ यांचं कौतुक थेट डोळ्यांतून ओसंडून वाहत होतं. लहानपणी जो अभ्यासू, तेजस्वी मुलगा आम्ही पाहिलाय, आज तोच आमच्या घराचं नाव मोठं करतोय. हे आमचं भाग्य आहे, असं सांगताना त्यांच्या मामींचे डोळे पाणावले होते. फडणवीसांच्या मामे भावांनीही आपल्या भाच्याच्या यशावर अभिमान व्यक्त केला. अमरावतीमध्ये फटाके, मिठाई आणि ढोल-ताशांच्या गजरात साजरा झालेला हा आनंद अक्षरशः सर्वत्र पसरला.

Atul Londhe : गांधींना ईडीचं आरोपपत्र नव्हे, हे सूडपत्र 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावतीशी ऋणानुबंध खूप खोल आहे. त्यांच्या आई सरिता फडणवीस या कलोती घराण्याच्या चौथ्या क्रमांकाच्या कन्या. देवेंद्र यांनी लहानपणी आपल्या अनेक उन्हाळ्याच्या सुट्ट्या अमरावतीतच घालवल्या. त्याकाळी ते एक जबरदस्त क्रिकेटपटूही होते. स्नेहसंवर्धक क्रीडा मंडळाचे ते कर्णधार होते आणि त्यांचं नेतृत्व अनेकांनी जवळून अनुभवलेलं आहे. आजही अमरावतीतील अनेक क्रिकेटपटू त्यांचे बालपणीचे सखे-सोबती आहेत.

मनाचं नातं

साधेपणा आणि प्रेमळ स्वभाव यामुळेच देवेंद्र फडणवीस सामान्य जनतेच्या मनात घर करून बसले आहेत. अमरावतीत असताना राजकमल चौकातील ‘दुग्धपुर्णा’ येथे त्यांना मिल्कशेक प्यायला आवडायचं. न्याहारीत पोहे आणि समोसे तर त्यांचे नेहमीचे फेव्हरेट. गोडात त्यांना जिलेबी विशेष प्रिय आहे. संगीतप्रेमी फडणवीस हे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचे मोठे फॅन आहेत.

राजकारणाच्या धावपळीतून वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिखलदरा आणि मालदीवसारखी ठिकाणं खूप प्रिय आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं, जुन्या आठवणींना उजाळा देणं हे त्यांना मानसिक ऊर्जा देतं. मुख्यमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर कलोती कुटुंबीय अठरा जणांचा मोठा ग्रुप घेऊन अंबा एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाला होता. मुख्यमंत्र्याला प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करायचं, ही त्यांची खूप दिवसांची इच्छा अखेर पूर्ण झाली. फडणवीस यांचा हा दौरा केवळ शासकीय नव्हे, तर नात्यांचा उत्सव देखील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अमरावती शहराशी असलेलं ऋणानुबंध पुन्हा एकदा दृढ झालं. आज ‘भाचा मुख्यमंत्री झालाय’ या आनंदात कलोती कुटुंबीय आणि संपूर्ण अमरावती न्हालं गेलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!