
गडचिरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. पवार काका-पुतण्या एकत्र येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळानं आता वेगानं काम सुरू केलं आहे. आता मंत्रिमंडळात कोणाच्या नावाचा समावेश होईल असं वाटत नाही. मंत्रिपदासाठी इच्छुकांना अडीच वर्षांनंतर संधी मिळण्याची शक्यता आहे. अशात गडचिरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दावा केला आहे. आपल्या नशिबात मंत्री होणं लिहिलेलं आहे. त्यामुळं आपण मंत्री नक्की होणार असा दावा आत्राम यांनी केला आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने महायुतीमधील अनेक नेते नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ वारंवार आपली नाराजी जाहीर करत आहेत. या सर्व घडामोडीत आत्राम यांनी हा दावा केला आहे.
शरद पवार आणि अजित पवार हे लवकरच एकत्र येतील असंही आत्राम म्हणाले. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास महाराष्ट्रात आणि देशात एक प्रकारची क्रांती होईल. शरद पवार यांनी राष्ट्रीय सेवक संघाने निवडणूक प्रचारात केलेल्या कार्याच कौतुक केले. ते योग्यच असल्याचे आत्राम म्हणाले. शरद पवार यांनी आमच्यासोबत यावे. हे सगळ्यांचे मत आहे. परंतु पवार महायुतीमध्ये येतील असं वाटत नाही. मत परिवर्तन होऊन ते महायुतीकडे आले तर विकासात त्याचा फायदा होईल, असंही आत्राम यांनी नमूद केलं.

पदासाठी Wait करायला तयार
महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आता पूर्ण झाला आहे. अडीच वर्षानंतर कॅबिनेटमध्ये फेरबदल होईल असं सांगण्यात येत आहे. तोपर्यंत थांबण्यासाठी धर्मराव बाबा आत्राम तयार असल्याचं त्यांच्या विधानावरून दिसत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने महायुतीमधील अनेक नेते नाराज आहेत. छगन भुजबळ यांची प्रचंड नाराजी आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. खाते वाटपानंतर अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारला.
महायुतीमधील काही नेते अद्यापही मंत्रिपदासाठी प्रयत्न करीत आहेत. मंत्रिपद न मिळालेले अनेक जण महामंडळासाठी सरसावले आहेत. अनेकांनी आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी देखील जोर लावला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काही नवीन महामंडळांची घोषणा झाली. त्या महामंडहाच्या अध्यक्ष पदासाठी सुद्धा आमदार जोर लावत आहेत. बहुतांश आमदारांना महामंडळ नको आहे. त्याऐवजी त्यांना मंत्रिपदच हवं आहे. सद्य:स्थितीत महायुती सरकारमध्ये एकूण 36 कॅबिनेट मंत्री आहेत. राज्यमंत्र्यांची संख्या सहा आहे. त्यामुळं तूर्तास नव्यानं कोणाचाही मंत्रिमंडळात समावेश होईल, असं दिसत नाही. परिणामी धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह सर्वच इच्छुकांना आता अडीच वर्ष प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं दिसत आहे.