
नागपूर रेल्वे विभागात दीपचंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरक्षा विभागाने तस्करीविरोधात ठोस पावलं उचलली आहेत. गोंदिया स्थानकावर दहा किलोहून अधिक चांदीसह दोघांची अटक करत प्रशासनाने दक्षतेचे प्रत्यंतर घडवले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील विभागीय सुरक्षा आयुक्त श्री दीपचंद्र आर्य यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा विभागाने एक अत्यंत महत्त्वाची आणि यशस्वी कारवाई पार पाडली आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर 10.368 किलो चांदीच्या दागिन्यांसह दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. सदर मालाची एकूण किंमत सुमारे 9 लाख 74 हजार 592 रूपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई 7 एप्रिल 2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

दीपचंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरक्षा विभागाने गेल्या काही काळात अवैध तस्करीविरोधात विशेष मोहीम राबवली आहे. यामध्ये बंदीस्त माल, अंमली पदार्थ, रोख रक्कम, आणि मौल्यवान धातू तसेच मानवी तस्करी रोखण्यासाठी सातत्याने तपासणी मोहिम सुरू असून, या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरते.
Devendra Fadnavis : मिहानमध्ये उभारणार आधुनिक आपत्ती व्यवस्थापन संस्था
आयकर विभागाकडून चौकशी
गोंदिया रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक 15231 (गोंदिया-बरौनी एक्सप्रेस) आगमनावेळी रेल्वे सुरक्षा विभागाच्या तपासणी पथकाने दोन संशयित व्यक्तींना पकडले. नरेश कन्हैयालाल वलैचा ( वय 62) आणि विष्णू गोपीचंद नागभीरे ( वय 54) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही गोंदिया जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली असता तब्बल 10.368 किलोग्रॅम चांदीचे दागिने आढळले. या मालासाठी त्यांच्या जवळ कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती, त्यामुळे तस्करीचा संशय बळावला.
आयकर विभाग, नागपूर यांना तातडीने सूचित करण्यात आले. सदर दागिन्यांची सध्या तपासणी प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे रेल्वेमार्गे होणारी मौल्यवान वस्तूंची बिनधास्त वाहतूक आणि करचुकवेगिरीला मोठा धक्का बसला आहे.
यंत्रणांमध्ये विश्वास
कारवाईमध्ये निरीक्षक कुलवंत सिंह यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राहुल पांडेय, स.उ.नि. धर्मेंद्र कुमार, आरक्षक विशाल ठावरे, उपनिरीक्षक दीपक कुमार आणि प्रधान आरक्षक मिथिलेश कुमार चौबे यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या तत्परतेमुळे ही कारवाई यशस्वी झाली.
दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनामुळे नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा विभागाचे कार्य अधिक सशक्त झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अनेक मोहिम नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी ठरत आहे. प्रशासनाच्या पारदर्शक आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीला अधिक बळ मिळत आहे.
रेल्वे सुरक्षा विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की, रेल्वेमार्गे होणाऱ्या बंदीस्त व अवैध वस्तूंची तस्करी, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू आणि मानवी तस्करीविषयी कोणतीही माहिती आढळल्यास ती तत्काळ संबंधित यंत्रणेला कळवावी. यामुळे वेळीच कारवाई होऊ शकते आणि समाजात सुरक्षितता नांदू शकते.