फेक कॉल, ओटीपी आणि आधार कार्डाचा वापर करून थेट वाळू चोरीचा प्रकार समोर आला आहे. गरिबांच्या नावावर वाळू उचलून मोठ्या प्रमाणात फसवणुकीचं जाळं उभं राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
मोहाडी तालुक्यातील वरठी गावात राहणाऱ्या एका सामान्य नागरिकाच्या नावाचा गैरवापर करून, फेक कॉलद्वारे थेट वाळू चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वरठी येथील अश्विन शेंडे या तरुणाला 24 मे 2025 रोजी एक फोन आला, तोही सरकारी ‘घरकुल रॉयल्टी’संदर्भात. फोनवरून त्याच्याकडून एक ओटीपी मागवला गेला आणि त्याने तो सहजपणे सांगितलाही. पण त्यानंतर घडलेले प्रकार अक्षरशः धक्कादायक होते.
सोनुली ग्रामपंचायतीच्या हद्दीतून तब्बल 5 ब्रास वाळू त्याच अश्विन शेंडे यांच्या नावाने उचलण्यात आली. विशेष म्हणजे, शेंडे यांचा या गावाशी कोणताही संबंध नाही. ना ते तेथील रहिवासी, ना त्या गावात घरकुल लाभार्थी. म्हणजेच, अस्सल नोंदीशिवाय, त्यांचं नाव वापरून वाळू चोरी झाली, तेही एका फोन कॉलमुळे.
अपघाती प्रकार नाही
या घटनेची कल्पना येताच अश्विन शेंडेंनी 9 जून रोजी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. मात्र या तक्रारीनंतरही तपास फारसा पुढे सरकलेला नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तपासाची दिशा चुकीच्या मार्गाने जात असल्याचा आरोप करत 4 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली.
सूचना अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ट्रकद्वारे अश्विन शेंडेंच्या नावाने वाळू उचलली गेली, त्याच ट्रकद्वारे 1 मार्च 2025 ते 9 जून 2025 या कालावधीत एकूण 39 लोकांच्या नावावर वाळू उचलण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, त्यापैकी तब्बल 30 लोक हे घरकुल लाभार्थ्यांच्या अधिकृत यादीतच नाहीत. म्हणजेच हा एक केवळ अपघाती प्रकार नसून संगनमताने सुरू असलेली एक फसवणूक साखळी आहे, असे स्पष्ट होत आहे.
ठोस माहिती नाही
इतकेच नव्हे, तर या संपूर्ण व्यवहारात शेंडेंच्या आधार कार्डाचा वापर करण्यात आला. त्यांच्या ओळखीचा गैरवापर करून ही रचना आखली गेली. यासंदर्भात 9 जून रोजी वरठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 13 जूनला दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल झाले. पण त्यानंतर पोलिसांकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही, किंवा चौकशीचे अपडेटही दिले जात नाही.
उच्चस्तरीय चौकशी
या पार्श्वभूमीवर 4 ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते अश्विन शेंडे, माजी पंचायत समिती सदस्य रवि येलणे, अरविंद येलणे, सामाजिक कार्यकर्ते संजय वासनिक आदींच्या उपस्थितीत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
हा प्रकार केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण यंत्रणाच एका असुरक्षित आणि फसवणूकप्रवण अवस्थेत असल्याचे चित्र उभं करतो. आधार कार्ड, ओटीपी, घरकुल योजना, यांचा वापर फसवणुकीसाठी कसा केला जातो, याचे हे एक जिवंत उदाहरण ठरू शकते. फेक कॉल्स, स्कॅम्स आणि आता वाळू तस्करी. यांचं सगळं जाळं आणखीनच गुंतागुंतीचं होतंय. नागरिकांच्या डेटाचा गैरवापर होतोय, आणि त्यातून सरकारच्या योजना आणि नैसर्गिक साधनसंपत्ती दोन्हींचा वापर ‘त्या’ मंडळींच्या फायद्यासाठी केला जातोय.