महाराष्ट्र

Amol Mitkari : झाकणझुल्या पुरस्कार, लक्ष्मण हाके हक्कदार

Laxman Hake : फॉर्च्यूनरची स्वारी, पण ड्रायव्हरचा पगार गायब 

Author

अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यातील संघर्ष आता आरोपांच्या व्हिडिओ वॉरपर्यंत पोहोचला आहे. हकीम साठी YZ शब्द अगदी योग्य असल्याचा पुन्हा एकदा मिटकरींनी चिमटा घेतला. 

राजकारणाच्या रंगमंचावर सध्या एका खास ‘नाटकाचा’ डाव रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात सध्या शाब्दिक आरोप-प्रत्यारोपांचे रणकंदन सुरू आहे. सोशल मीडियावरही दोघेही एकमेकांवर सडेतोड टीका करताना दिसत आहेत. पण यावेळी मिटकरींनी एक पाऊल पुढे टाकत, लक्ष्मण हाकेंना ‘झाकणझुल्या पुरस्कार 2025’ देण्याची खोचक शिफारस करत एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये हाकेंच्या माजी चालकाने थेट त्यांच्यावर आर्थिक अन्यायाचे आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत.

अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, त्याला YZ उपमा योग्यच होती. जो स्वतःच्या ओबीसी बांधवांवर अन्याय करून त्यांच्या भावना पायदळी तुडवतो आणि त्याच वेळी ड्रायव्हरचा पगारही देत नाही, तो समाजाने दिलेली फॉर्च्युनर कोणत्या तोंडाने स्वीकारतो? अशा व्यक्तीला मी ‘झाकणझुल्या पुरस्कार 2025’ साठी शिफारस करतो. आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्याच एका माजी चालकाचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. ज्यात हाकेंविरोधात अनेक संतापजनक गोष्टी समोर आल्या आहेत.

बनवाबनवीचा आरोप

व्हिडिओमध्ये संबंधित चालकाने म्हटले की, गेल्या पाच वर्षांपासून मी हाके सरांसोबत काम करतो आहे. तीन वर्षे मी त्यांच्याकडे कोणताही पगार न घेता समाजसेवेच्या नावाखाली काम केले. पण जेव्हा मी काम सोडायचं ठरवलं, तेव्हा त्यांनी मला पगार देतो असं सांगितलं. मात्र त्यांनी ना पगार दिला, ना माझ्या पत्नीला नोकरी दिली, जशी त्यांनी पूर्वी हमी दिली होती. याचबरोबर त्याने असा खळबळजनक आरोपही केला की, मी पैसे मागायला लागलो तेव्हा त्यांनी मला उत्तर न देता उलट माझ्या भावाला कॉल करून धमकी दिली.

पुढे बोलताना चालक म्हणतो, “हाके सरांनी मला कोर्टात जा असं म्हटलं. पण जर माझ्याकडे कोर्टात जाण्याची ऐपत असती, तर मी का पगार मागितला असता? मग मीच तिथे गेलो असतो. आता जर मला पैसे मिळाले नाहीत, तर मी माझ्या पत्नी आणि मुलांसह मंत्रालयासमोर उपोषण करणार आहे. मला अमोल मिटकरी साहेब नक्कीच न्याय देतील अशी मला खात्री आहे.

Amol Mitkari : पार्श्वभागावर Y-Z पॅन्ट घातल्यावरही दिसेल, असे देऊ मंजन

वाद चिघळणार

लक्ष्मण हाके यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये असं विधान केलं होतं की, समाजाने आपल्याला फॉर्च्युनर भेट दिली. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी ही टीका करत, “समाजाने दिले तरी लोकांचे श्रम आणि त्यांचा सन्मान महत्त्वाचा आहे, असे ठाम मत व्यक्त केले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना हाकेंनीही काही खोचक विधानं केली होती. मात्र आता जेव्हा मिटकरींनी व्हिडिओसह हा मुद्दा समोर आणला आहे, तेव्हा हा वाद केवळ राजकीय मर्यादेत न राहता वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावरही चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सामाजिक नेतृत्वाची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तींनी व्यक्तिगत गरजा, सेवकांची अडचण आणि समाजाची भावना यांचा सन्मान राखणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात जे आरोप समोर येत आहेत, ते लक्ष्मण हाकेंच्या सामाजिक प्रतिमेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. दुसरीकडे अमोल मिटकरी यांची ट्विटरवरील भाष्यं हे या वादाला अधिकच तिखट बनवत आहेत.

खऱ्या न्यायाची अपेक्षा

हे प्रकरण केवळ दोन नेत्यांमधील खालच्या पातळीवरची कुरघोडी नाही. समाजाच्या प्रतिनिधित्वाचा आणि सामान्यांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. आता यामध्ये खरे काय आणि खोटं काय हे सत्ताधाऱ्यांच्या किंवा न्यायव्यवस्थेच्या चौकशीतूनच समोर येईल. पण एक गोष्ट नक्की की, ‘झाकणझुल्या पुरस्कार’ या उपमेनं महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर एक नवीनच विनोदी वाद जन्माला आला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!