शिक्षण खात्याला हादरवणाऱ्या नागपूरच्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारे अद्याप फरार आहे. तर दुसरीकडे 632 कर्मचाऱ्यांची कागदपत्रेच गायब असल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
राज्यभर गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याचे थरारक प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे व धक्कादायक होत चालले आहे. शिक्षण व्यवस्था डळमळीत करणाऱ्या या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार, वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे तब्बल दीड महिन्यांपासून पोलिसांच्या तावडीतून सुटून बेपत्ता आहे. तांत्रिक युगात ‘स्मार्ट आणि हायटेक’ पोलिस त्याच्यापर्यंत पोहचू शकत नाहीत, हेच अनेकांच्या मनात संशयाचे वादळ निर्माण करत आहे. सोशल मीडियावर, वर्तमाने माध्यमात एकच चर्चा की, वाघमारेच्या पाठीशी कोणाचा अदृश्य हात आहे काय?
सध्या राज्य सरकारच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांच्याकडे या संपूर्ण घोटाळ्याची प्रशासकीय चौकशी सुरू आहे. या तपासाअंतर्गत माध्यमिक शिक्षण विभागातील 1036 कर्मचाऱ्यांच्या फायलींचा अभ्यास केला जात आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील तब्बल 632 कर्मचाऱ्यांची कागदपत्रेच गायब असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या चौकशीची शिफारस अंतरिम अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे. ही बाब शिक्षण खात्याच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
लोकेशन ट्रेसला चकवा
नीलेश वाघमारे अजूनही पोलिसांच्या हाती न लागल्यामागे एक चकव्यात टाकणारी यंत्रणा कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो सतत व्हॉट्सॲप कॉलिंगच्या माध्यमातून संवाद साधत आहे, तर त्याचे जवळचे मित्र त्याला सातत्याने नवीन सिमकार्ड्स पुरवत असल्याने त्याचे लोकेशन ट्रेस करणे अधिकाधिक कठीण बनत आहे. तपास यंत्रणांच्या नाकीनऊ आणणाऱ्या या पद्धतीमुळे, घोटाळ्याच्या मुळाशी पोहचण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
चौकशी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक अधिकृत पत्र पाठवून नीलेश वाघमारेच्या निकटवर्तीय मेघा वाघमारे हिने चौकशीला सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे. तथापि, तिचे उत्तर साशंक व दिशाभूल करणारे असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, कारण ती वारंवार माझ्याकडे कोणतीच माहिती नाही, असे उत्तर देत आहे.
संस्थाचालकांना अटक
या मोठ्या घोटाळ्याचा मागोवा घेताना पोलिसांनी दोघा शिक्षण संस्थाचालकांनाही अटक केली आहे. त्यामध्ये जयहिंद प्राथमिक शाळा (मानेवाडा, नागपूर) व गुलशन नगर संस्थेचे संस्थापक ओंकार भाऊराव आंजीकर. विठ्ठल-रुक्मिणी प्राथमिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक दिलीप धोटे. हे दोघेही वाघमारेच्या संपर्कात होते आणि त्यांच्या संस्थांमधूनही शालार्थ घोटाळ्यातील बोगस भरतीचे धागेदोरे सापडल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.
दिल्ली ते गोवा शोध
वाघमारेचा शोध घेण्यासाठी सायबर क्राइम व एसआयटीच्या विशेष पथकांनी दिल्ली, मुंबई, गोवा व हैदराबाद या ठिकाणी धाडसी मोहिमा राबवल्या. मात्र, कुठेही वाघमारेच्या वावराचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे तो देशाच्या बाहेर गेला की, त्याला कुणी सरंक्षण दिले आहे, हे शोधणे हे तपासाचे पुढचे उद्दिष्ट असणार आहे.
हा संपूर्ण प्रकार केवळ शिक्षण यंत्रणेतील बकाल व्यवस्थेचे प्रतिबिंब नाही, तर कायद्याच्या अंमलबजावणी यंत्रणांवर देखील प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. नीलेश वाघमारेच्या अटकेसाठी पोलीस आणि तपास यंत्रणा किती वेळा थांबतील? गायब कागदपत्रांचा तपास आणि संस्थाचालकांवर केलेली कारवाई कितपत पुरेशी आहे? सर्वसामान्य शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये या सर्व गोंधळामुळे भ्रम निर्माण झाला आहे.
