नागपूर विमानतळाच्या हवाई सेवेत मोठी क्रांती. 24 तास उड्डाणे आणि नव्या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होत असल्याने प्रवाशांसाठी सोयीसुविधा अधिक व्यापक झाल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे ‘रि-कॉर्पेटिंग’ काम अखेर पूर्ण झाले आहे. नागपूर विमानतळ आता 24 तास कार्यरत राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या उड्डाणांच्या सुरुवातीमुळे शहराच्या हवाई संपर्कातही मोठी वाढ होणार आहे. गेल्या वर्षभरापासून नागपूर विमानतळावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत विमानसेवा बंद होती. धावपट्टीच्या रि-कॉर्पेटिंगच्या कामामुळे हा निर्बंध लागू करण्यात आला होता. अखेर 31 मार्च 2025 रोजी हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विमानतळावर आता विमानांचे नियमित व निर्बाध उड्डाण सुरू झाले आहे. तसेच नवीन उड्डाणांसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
नव्या वेळापत्रकानुसार, नागपूरहून कोल्हापूर, जयपूर आणि नोएडा या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. इंडिगो एअरलाईन्स नागपूर-जयपूर-नागपूर सेवा सुरू करणार आहे. स्टार एअर नागपूर-कोल्हापूर-नागपूर मार्गावर उड्डाण सुरू करणार आहे. हे विमान दुपारी 3.45 वाजता नागपुरात पोहोचेल आणि 4.15 वाजता कोल्हापूरला रवाना होईल. इंडिगो एअरलाईन्स नागपूर-नोएडा मार्गावर नवी सेवा उपलब्ध करून देणार असून, हे विमान दुपारी 4.30 वाजता सुटणार आहे.
सुरळीत प्रवास
नागपूरहून प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पुणे, बंगळुरू, दिल्ली, इंदूर आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांसाठी अतिरिक्त उड्डाणे सुरू केली जात आहेत. इंदूर विमानसेवा 26 जुलैपासून सुरु होणारी ही सेवा दुपारी 12.35 वाजता नागपुरात पोहोचेल आणि 12.10 वाजता इंदूरला रवाना होईल. कोलकाता विमानसेवा 30 जुलैपासून सुरू होणार आहे. कोलकात्याहून येणारे विमान दुपारी 12.15 वाजता नागपूरला पोहोचेल आणि दर बुधवारी 12.45 वाजता दिल्लीला रवाना होईल. बंगळुरूसाठी अतिरिक्त विमान दुपारी 2.20 वाजता नागपुरात उतरेल आणि 2.55 वाजता बंगळुरूकडे प्रयाण करेल.
नागपूर विमानतळावरील सुविधा व सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहे. धावपट्टीच्या सुधारित अवस्थेमुळे मोठ्या विमानांसाठीही संधी वाढली आहे. नवीन उड्डाणांमुळे नागपूरचा व्यापारी व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा केंद्र म्हणून विकास होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना अधिक सोयीसुविधा आणि विविध शहरांसाठी सहज उपलब्ध असलेल्या उड्डाणांमुळे नागपूर विमानतळ देशाच्या प्रमुख विमानतळांपैकी एक म्हणून स्थान निर्माण करत आहे. नागपूर विमानतळावर 24 तास विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रवाशांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. नवीन उड्डाणांमुळे नागपूर शहराचा हवाई संपर्क वाढणार असून, व्यापार, पर्यटन आणि व्यवसायासाठी हा मोठा फायदा ठरणार आहे. नागपूरच्या विमानसेवेचा विस्तार हा संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.