
नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या ई-पंचनामा अॅपला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचा सन्मान करण्यात आला.
राज्याच्या प्रशासनाला गतिमान करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे जलद आणि पारदर्शक पंचनामे करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ई-पंचनामा अॅप या अभिनव तंत्रज्ञान उपक्रमासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात वर्ष 2023-24 आणि 2024-25 या कालावधीतील गतिमान प्रशासनाच्या विविध श्रेणीतील अधिकारी आणि कार्यालयांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कौशल्य, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते. बिदरी यांच्या नेतृत्वात नागपूर विभागाने तांत्रिक प्रगतीच्या दिशेने उचललेले हे पाऊल राज्यासाठी प्रेरणादायक ठरले आहे.

खात्यात मदतीचा प्रवाह
पूर्वी पंचनाम्याच्या प्रक्रियेसाठी दोन ते अडीच महिने लागायचे. मात्र विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या कल्पकतेतून जन्माला आलेल्या या अॅपमुळे केवळ सात दिवसांत पंचनामे पूर्ण करून डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पोहोचवणे शक्य झाले. डिसेंबर 2022 मध्ये अॅपची संकल्पना साकारत एप्रिल 2023 मध्ये प्रत्यक्षात ते वापरण्यास सुरूवात झाली.
मे आणि जून 2023 मध्ये नागपूर विभागातील जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांना अॅप वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर संपूर्ण नागपूर विभागात यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर राज्य शासनाने ‘ई-पंचनामा अॅप’चा संपूर्ण राज्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला.
Amravati : काँग्रेस विरोधात भाजपने काढली प्रेतयात्रा, पोलिसांशी झटापट
महाराष्ट्रात अॅपची अंमलबजावणी
राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत, लोकाभिमुख आणि गतिशील प्रशासनासाठी विविध स्तरांवर स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका, वर्धा व भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर जिल्हा परिषद तसेच गडचिरोलीच्या नायब तहसीलदार कार्यालयाला विविध श्रेणींमध्ये गौरवण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून हा पुरस्कार स्वीकारताना प्रत्येक अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता. ई-पंचनामा अॅपने केवळ वेगवान नाही, तर पारदर्शक आणि विश्वासार्ह प्रशासनाची नवी दिशा दाखवली आहे.
ई-पंचनामा अॅपसारख्या तंत्राधिष्ठित उपक्रमाच्या यशामागे ठोस नियोजन, अधिकारी वर्गाची बांधिलकी आणि नेतृत्वगुणांचे महत्त्व आहे. या अभिनव उपक्रमामुळे प्रशासनातील विलंब, त्रुटी आणि गैरव्यवहाराला आळा बसला आहे. राज्य शासनाने या यशस्वी प्रयोगाला प्रोत्साहन देत संपूर्ण राज्यात विस्तार केल्याने हा उपक्रम केवळ नागपूर विभागापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्राचे उदाहरण ठरला आहे.