केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात बोलताना, जातीपेक्षा शिक्षण, कौशल्य आणि गुणवत्ता अधिक महत्त्वाची असल्याचा ठाम संदेश दिला. आपल्या अनुभवातून त्यांनी समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारे विचार मांडले.
नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक प्रांजल, अनुभवसंपन्न आणि विचारप्रवृत्त भाषण करत शिक्षण, कौशल्य आणि समाजातील खऱ्या प्रगतीसंबंधी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की माणसाचं स्थान त्याच्या जातीमुळे नव्हे, तर त्याच्या ज्ञानामुळे आणि कर्तृत्वामुळे ठरतं.
गडकरी म्हणाले की, मी ब्राह्मण आहे, हे मी लपवत नाही. पण महाराष्ट्रात आमच्या समाजाला फारसं महत्त्व मिळत नाही. उत्तर भारतात मात्र आमची खूप चलती आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये दुबे, मिश्रा, चतुर्वेदी आदी ब्राह्मण नेत्यांना मोठा मान आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट केलं की ते या गोष्टीचा प्रचार करत नाहीत, तर समाजात अजूनही गुणवत्तेपेक्षा जातीचा विचार होतो, ही वस्तुस्थिती आहे, याकडे ते लक्ष वेधत आहेत.
खरा नेता
नितीन गडकरींनी एक किस्सा सांगितला की, एकदा उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात उपस्थित लोकांनी त्यांना अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर ब्राह्मण समाजाचा खरा नेता म्हणून संबोधलं. तेव्हा गडकरी यांनी त्यांना उत्तर दिलं, मी जातपात मानत नाही. तुम्ही माझं कौतुक माझ्या कार्यामुळे करा, जात पाहून नाही.
पुढे बोलताना गडकरी यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण हीच आपली खरी शक्ती आहे. आजही अनेकजण ट्रक ड्रायव्हर, टपरीवर चहा विकणं, अशी छोटी-मोठी कामं करताना दिसतात. त्यांच्यात कौशल्य आहे, पण शिक्षणाचा अभाव त्यांना मागे टाकतो, असे ते म्हणाले. त्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीने विविध भाषांमध्ये शिक्षण घ्यावं, अशी त्यांनी सूचना दिली.
खोडकर विद्यार्थी, हटके विचार
गडकरी म्हणाले की, केवळ मार्क्स मिळवणं म्हणजे यश नव्हे. लॉ कॉलेजमध्ये असताना जे विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये होते, त्यांची वकिली आज फारशी चाललेली नाही. पण जे विद्यार्थी खोडकर आणि हटके विचार करणारे होते, ते आज कोटीत कमावणारे मोठे वकील बनले आहेत. शिक्षण, कौशल्य, अनुभव आणि हजरजबाबीपणा हे यशाचे खरे घटक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
गडकरी यांनी एक सामाजिक जाणिवेचा प्रसंगही सांगितला. आमदार असताना त्यांना एक इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्यांनी स्वतः ती संधी न घेता ती नागपुरातील एका मुस्लिम संस्थेला दिली. आज त्या संस्थेमधून ८-१० मुस्लिम विद्यार्थी इंजिनिअर होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. “त्या समाजाला त्या संधीची जास्त गरज होती. म्हणून मी ती त्यांना दिली,” असंही त्यांनी नमूद केलं.
नागरिकांना केल जागृत
शेवटी ते म्हणाले, ज्ञान मिळालं तरच जीवनात यश मिळतं. नाहीतर मंदिरात जा, मशिदीत जा, 100 वेळा नमाज पढा, पण जर इंग्रजी येत नसेल, गणित, विज्ञान समजत नसेल, तर तुम्ही प्रगती कशी करणार? त्यांनी हे उदाहरण देऊन उपस्थितांना जागृत केलं की, धार्मिकता वैयक्तिक असू शकते, पण समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणच एकमेव उपाय आहे.
नितीन गडकरी यांचे हे संपूर्ण भाषण जातिव्यवस्थेचा प्रचार न करता, तिच्या मर्यादा स्पष्टपणे दाखवत, समाजाला शिक्षणाच्या दिशेने वळवण्याचा एक स्पष्ट प्रयत्न होता. जातीच्या संदर्भात विधान करताना त्यांनी ते मुद्दाम प्रांजळपणे आणि संवेदनशीलतेने मांडले, जेणेकरून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि समाजाला एक समतोल संदेश मिळेल.