शाळाबाह्य कामं, विद्यार्थ्यांची कमी होत असलेली पटसंख्या, शिक्षणाचा दर्जा कायम ठेवण्याचं आव्हान, पोषण आहार अशा सर्व जबाबदाऱ्या पेलणाऱ्या शिक्षकांच्या लढ्याला न्याय मिळवून देण्यात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.
राज्यभरातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. यापैकी आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा गहन बनला होता. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी आक्रमक भूमिका घेत होते. यासंदर्भात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी सकारात्मक पुढाकार घेतला होता. डॉ. फुके यांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे. सरकारनं शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील हजारो शिक्षकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रात हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे. यामुळं शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत आणखी पारदर्शका येणार आहे.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावी, यासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांनी सतत पाठपुरावा सुरू केला होता. शिक्षकांच्या समस्यांचं निराकरण व्हावं, या हेतूनं त्यांनी या प्रयत्नाला सुरुवात केली होती. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे राज्यभरातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न आता निकाली लागणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात आला आहे. शिक्षकांच्या मागण्यांना आमदार डॉ. फुके यांच्यामुळं सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ग्राम विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचं आमदार डॉ. फुके यांनी म्हटलं आहे.
Yavatmal Mafiya : ‘वादग्रस्त’ लोकप्रतिनिधीकडून पोलिसांना वाळू वसुलीचे टार्गेट
मोठी सुविधा मिळणार
गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रखडलेली होती. आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षक संघटनांनी सातत्याने आवाज उठवला होता. यासंदर्भात आमदार डॉ. परिणय फुके यांनी सरकारकडं पत्रव्यवहार केला. मंत्रिमंडळ स्तरावर त्यांनी सरकारडं आग्रह धरला. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळालं आहे. 6 एप्रिलपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात येणार आहे.
सरकार पातळीवरून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली होती. 2017 मध्ये महायुती सरकारच्या काळात आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकारानं ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरू झाली होती. या बदलीमुळं हजारो शिक्षकांना न्याय मिळाला होता. शिक्षकांच्या बदलीत भ्रष्टाचाराला आळा बसला होता. परंतु त्यानंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. शिक्षक सहकार व अन्य शिक्षक संघटनांनी यासंदर्भात वारंवार राज्य सरकारकडं पाठपुरावा केला. परंतु सरकारनं लक्ष दिलं नाही.
आमदारांकडं पाठपुरावा
सरकारी पातळीवर दाद न मिळाल्यानंतर शिक्षकांनी आमदार डॉ. परिणय फुके यांची भेट घेतली. त्यांच्या नेतृत्त्वाखाली 12 आमदारांनी या मागणीसाठी विशेष प्रयत्न केले. अखेर शिक्षक भरती पूर्वीच प्रलंबित आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवली जाणार आहे. बदल्यांसाठी शिक्षकांना 1 ते 10 मार्चपर्यंत आपली माहिती पोर्टलवर अपडेट करावी लागणार आहे. 11 ते 13 मार्च या काळात जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची माहिती ऑनलाइन अपलोड होणार आहे.
14 ते 20 मार्चदरम्यान शिक्षकांना अर्ज करता येईल. अर्ज भरल्यानंतर 21 ते 25 मार्चदरम्यान अर्जांची तपासणी होईल. 6 एप्रिलपर्यंत संपूर्ण बदली प्रक्रिया पूर्ण होईल. आमदार डॉ. परिणय फुके यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हजारो शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. त्यांना हक्काच्या बदली मिळणार आहे. हा केवळ एक सरकारी निर्णय नाही. शिक्षकांच्या भावनांचा आदर झाला आहे, असं शिक्षक संघटनांनी नमूद केलं आहे.