
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याऐवजी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. उद्धव ठाकरे यांच्या मुळेच ते निर्माण झाले आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “शिवसेना या चार अक्षरांमुळे आम्ही सगळे निर्माण झालो. एकनाथ शिंदे यांनी जे काही मिळवलं आहे, ते उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीमुळेच. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचेच प्रोडक्शन आहेत. त्यांना राजकीय ओळख मिळवून देणारे उद्धव ठाकरेच होते. शिंदे यांचं संपूर्ण सत्तेचं अस्तित्व हे ठाकरे यांच्या ऊर्जेमुळेच आहे. मात्र, त्यांच्यात कृतज्ञतेचा भाव नाही, उलट कृतघ्नतेचेच दर्शन घडत आहे, असा घणाघात करत संजय राऊत यांनी शिंदे यांच्या राजकीय प्रवासावर प्रकाश टाकला.

राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की, आज एकनाथ शिंदे मोठ्या सत्तेवर बसले असले, तरी त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. उद्या जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे छत्र त्यांच्या डोक्यावर नसेल, तर त्यांचे भवितव्य काय असेल? याचा विचार त्यांनी गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात किंवा केदारनाथाच्या गुहेत जाऊन करावा.
Uddhav Thackeray : अधिवेशनाचा एकमेव फायदा; राज्याला मिळाले एक गाणे
शिंदेंच्या भोवती बिनडोक लोक
शिंदे गटातील नेत्यांवरही संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. शिंदे यांच्याभोवती सध्या बिनडोक लोकांचा गराडा आहे. त्यामुळेच त्यांचे अधःपतन सुरू आहे. हेच लोक कधीकाळी उद्धव ठाकरे यांना सांगत होते की, ‘हा माणूस विश्वासघात करेल. पण आता तेच लोक त्यांच्या अवतीभोवती वावरत आहेत. गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतरही बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कधीच वाईट बोलले नाही. कारण ते कृतज्ञ होते. पण शिंदे यांच्यात हा गुण नाही. त्यामुळेच त्यांनी जपून पावलं टाकावीत आणि टिकेला सहन करावं, असे राऊत म्हणाले.
भाजपवर निशाणा साधत राऊत म्हणाले, शिंदेंना भाजपने कुठल्या राष्ट्रीय कारणासाठी जवळ घेतलेलं नाही. फक्त पैशाच्या जोरावर ते शिवसेना फोडू शकले, म्हणून भाजपने त्यांचा उपयोग केला. त्यांना स्वतःची काही ताकद नाही. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात आयाराम-गयाराम संस्कृतीने जोर धरला आहे. सर्वोच्च न्यायालयालाही या प्रकारांवर टिप्पणी करावी लागली. हेच मोदी-शहा आणि फडणवीस यांच्या राजकारणाचे अपयश आहे.
सरकारला भीती
शिंदे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, आम्हाला रोज ‘रिक्षावाला’ म्हणत आहेत. मग आम्हाला कोणी फंडिंग करतंय का? तानाजी सावंत यांचा मुलगा 82 लाख रुपये खर्चून बँकॉकला जातो, मग त्यालाही परदेशी फंडिंग म्हणायचं का? राज्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, “महान लोकशाहीवादी सरकार राज्यात सत्तेवर आहे. पण घटनाबाह्य निर्णय घेत आहेत. विरोधी पक्षाला त्यांचं संविधानिक स्थानही देण्यात येत नाही. त्यामुळेच सरकारला भीती वाटते.
खासदार संजय राऊत म्हणाले, “आज शिंदे सत्तेत असले तरी त्यांची सत्ता अल्पायुषी आहे. कारण ती फक्त भाजपच्या आश्रयावर उभी आहे. उद्या भाजपने हात काढून घेतल्यास, त्यांना कुठेही आधार मिळणार नाही. संजय राऊत यांच्या या घणाघाती वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आता या टीकेला एकनाथ शिंदे काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.