
चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असा दावा केला. या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी फक्त हात जोडून मौन साधले.
राज्याच्या सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत नवे वादळ निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच केलेला 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील, हा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दाव्याला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न बोलताच उत्तर दिले. फक्त हात जोडून शुभेच्छा दिल्या आणि पत्रकारांपासून अंतर ठेवले.

हे मौन काहीतरी बोलतेय, असं चित्र आता शिवसेना-शिंदे गटात स्पष्टपणे उमटू लागलं आहे. दुसरीकडे रामदास कदम यांनीही उपरोधिक शैलीत भाजपवर टीका केली आहे. फडणवीस 2080 पर्यंत मुख्यमंत्री झाले तरी आमच्या शुभेच्छा, असं म्हणत टोला लगावला. मात्र, यातून शिंदे गटाचे मनोबल खचलेले दिसत आहे.
शिंदेंच्या नेतृत्वाखालीच निवडणूक
महायुती सरकारची पहिली आवृत्ती म्हणजेच महायुती-1 ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती. 2022 मध्ये बंडखोरी करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून हटवले. भाजपसोबत हातमिळवणी करून सरकार स्थापनेत मुख्य भूमिका बजावली. त्यावेळी मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले. भाजपने उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानले. आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील असे जाहीरपणे सांगितल्याने, शिंदे गटात अस्वस्थता आहे. ही भावना शिंदेंच्या वर्तनातून प्रकर्षाने जाणवते. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शांतपणे सहभागी होणे, फारसे भाष्य न करणे आणि वारंवार आपल्या गावी जाणे, या गोष्टी त्यांची अंतर्गत नाराजी स्पष्ट करत आहेत.
सातत्याने दरे या गावी शिंदे यांनी केलेल्या भेटींमुळे राजकीय विश्लेषकांत चर्चेला उधाण आले आहे. या भेटींमागे राजकीय चिंतन, आत्ममंथन आणि आगामी पावले ठरवण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्रीपदाचे स्थान पुन्हा धुक्यात जाताना दिसल्याने शिंदे गटाचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे चित्र आहे. भाजपकडून सुरु असलेले नेतृत्वाचे एकमुखी स्तुतीगान हे शिंदेंना अडचणीत आणणारे आहे. कारण, भाजपच्या तुलनेत शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी आहे. याचाच फायदा घेत भाजप एकहाती निर्णय घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे दिसते.
मौनातून राजकारणाचा आराखडा
महायुतीची यशस्वीता डबल इंजिन सरकार म्हणून मांडण्यात आली. पण आता या इंजिनपैकी एक थांबले आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करताना उघडपणे कौतुक झालेले नाही. त्यामुळे ही दुर्लक्षाची छटा शिवसेना शिंदे गटाला कमकुवत करत असल्याचे जाणवत आहे. राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न आता नव्याने चर्चेत आला आहे. फडणवीस यांचे नाव पुढे करून भाजपने आपली दिशा स्पष्ट केली आहे. पण शिंदे गटाला ही स्थिती फारशी सुखावणारी नाही. शिंदेंनी कोणतेही थेट विधान न करता, केवळ शुभेच्छा देणे आणि प्रसारमाध्यमांपासून अलिप्त राहणे हे त्यांचे राजकीय भाष्य आहे. हे मौन एका नव्या रणनितीचा भाग असू शकते. सध्या ते शांत आहेत, पण भविष्यात कोणता नवा निर्णय घेतील, हे सांगता येणार नाही.
Sanjay Gaikwad : महाराष्ट्रात गुन्हेगार हसतात अन् पोलिस गप्प बसतात