महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष एकत्र लढतील की स्वबळावर लढतील, हा अद्याप अनुत्तरित आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार लवकरच उडणार आहे. मिनी मंत्रालयासह महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींची निवडणूक पुढील महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. पण राज्यात अतिवृष्टी आणि महापूराने थैमान घातले आहे. 29 जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले असून, ग्रामीण भागातील लोक विचारत आहेत, ‘अशा संकटकाळात निवडणुकीचा गुलाल कसा उधळायचा?’ अतिवृष्टीने शेतकरी, गावकरी कंगाल झाले आहेत. तरीही निवडणुकीचा तमाशा कशाला, असा सूर उमटत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या फटकारामुळे राज्य निवडणूक आयोगाला तयारीला लागावे लागले आहे. आयोगाची अवस्था नमनालाच घडाभर तेल ओतल्यासारखी झाली आहे.
मतदार याद्यातील घोळ, व्हीव्हीपॅट यंत्रांची कमतरता आणि इतर यंत्रसामग्रीची चणचण यावरून विरोधकांनी आयोगाला धारेवर धरले आहे. विरोधी शिष्टमंडळाने आयोगाच्या नाकात दम आणला आहे. तरीही, स्थानिक निवडणुकींच्या प्रक्रियेला सुरुवात झाली तरी दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरतील. एक म्हणजे नैसर्गिक आपत्तीचा सामना आणि दुसरा राजकीय रणनीती. भाजपने आधीच आपली कंबर कसली आहे. अनेक स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतही अनेकांनी हा सूर आळवला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही या वादळात उडी घेतली आहे.
संघर्ष आणि तयारी
शिंदे गटाची निवडणुकीआधी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाइन बैठकीत स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविण्यात आली. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी ही बैठक होती. पण त्यातून स्थानिक निवडणुकींसाठीही स्वतंत्र रणनीती आखण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी सर्व नेत्यांना जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसोबतच शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख, मंत्री आणि आमदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी अर्ज भरण्यावर भर देण्यात आला.
सर्व पाहता, शिंदे गट महायुतीच्या छत्रछायेत राहण्याऐवजी स्वबळावर मैदान गाजवण्याच्या तयारीत दिसतो आहे. स्थानिक निवडणुकींमध्ये रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुतीत एकत्र लढण्याची आशा धूसर होत चालली आहे. शिंदे गटाच्या या निर्णयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची जुनी स्पर्धा नव्या रूपात समोर येण्याची शक्यता आहे. महायुतीच्या एकतेला धक्का देणारा हा निर्णय असू शकतो. भाजपच्या नेत्यांनीही स्वबळावर लढण्याचा नारा दिला असताना, शिंदे गटाची ही तयारी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिक निवडणुकीमध्ये युती करायची की नाही, यावरून आता पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्या आहेत.
Ravindra Chavhan : मंत्र्यांनो सज्ज व्हा, पक्षाची धुरा घट्ट करा
एकूणच, महाराष्ट्राच्या राजकारणात हा एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. स्वबळावर लढण्याच्या नाऱ्याने पक्षांची ताकद आजमावली जाईल. जनतेच्या मनात मात्र निवडणुकीपेक्षा मदतीची अपेक्षा आहे. हे वादळ कसे थांबेल, हे येणारा काळच सांगेल.