महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असून, केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबीयांनाही सुरक्षितता उरलेली नाही. मुक्ताईनगर येथे रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून, आता केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबीयांनाही सुरक्षितता उरलेली नाही. मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. यात्रेत फिरणाऱ्या कृषिका खडसे या युवतीचा काही टवाळखोर तरुणांनी पाठलाग केला, तिचे व्हिडीओ चित्रित केले, आणि सुरक्षा रक्षकाने रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला.
राज्यभरात यामुळे संतापाची लाट उसळली असून, भाजपच्या नेत्या असूनही त्यांच्या मुलीवर अशा प्रकारची घटना घडत असेल, तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. रक्षा खडसे यांनी स्वतः मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पोहोचून टवाळखोरांविरुद्ध तक्रार नोंदवली. मात्र, या घटनेनंतरही प्रशासनाची गती संथ असल्याने सरकारवर चौफेर टीका होत आहे.
सरकार नामशेष
पुण्यातील स्वारगेट येथे एका तरुणीवर अमानुष अत्याचाराचा मुद्दा ताजा असतानाच, आता जळगावमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलीलाच छेडछाड सहन करावी लागली, हे गंभीर आहे. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट चित्र यातून समोर आले आहे. एका मंत्र्याच्या मुलीला देखील सुरक्षा मिळत नसेल, तर सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचे काय? असा थेट सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. यात्रेमध्ये फिरणाऱ्या संरक्षणमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा सतत पाठलाग करणाऱ्या तरुणांनी तिच्या सुरक्षारक्षकालाही धमकावले, यावरून राज्यात गुंडाराज बोकाळले आहे, असे दिसून येते. अरेरावी करणाऱ्या या गुंडांना त्वरित शिक्षा न झाल्यास महिलांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
महाविकास आघाडीचा हल्लाबोल
महाविकास आघाडीने या घटनेनंतर सरकारला धारेवर धरले आहे. महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारणारे भाजप सरकार महिलांच्या सुरक्षेलाच अपयशी ठरले, असा आरोप केला आहे.भाजपच्या मंत्र्याचीच मुलगी असुरक्षित असल्यास राज्यातील सामान्य महिलांची काय स्थिती असेल, याचा विचार न केलेलाच बरा, असे रोखठोक वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. कायदा -सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर आता सरकार फसले आहे, हे स्पष्ट झाले आहे. महिलांसाठी कडक कायदे असल्याचे सांगणाऱ्या भाजपच्या सरकारमध्येच जर मंत्र्यांच्या कुटुंबियांना असुरक्षित वाटत असेल, तर राज्यातील सर्वसामान्य जनतेला कोणते संरक्षण मिळणार?
गुंडाराज कायम
मुक्ताईनगरच्या या घटनेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याऐवजी वेळकाढूपणा केल्याचे आरोप होत आहेत. टवाळखोर तरुणांनी पुन्हा पुन्हा पाठलाग करूनही त्यांच्यावर आधीच कठोर कारवाई करण्यात आली नव्हती, यामुळेच त्यांनी आणखी धैर्य दाखवत ही घटना घडवली. रक्षा खडसे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या प्रकरणात कडक कारवाईची मागणी केली आहे. मात्र, सरकारने गप्प राहून ही घटना दडपण्याचा प्रयत्न केल्यास जनतेचा रोष उफाळून येईल.
महिलांसाठी असुरक्षित महाराष्ट्र
महिलांच्या सुरक्षिततेवरून मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या सरकारने आता प्रत्यक्ष कृती करावी लागेल. भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारी वाढली असून, महिला सुरक्षेच्या गप्पा म्हणजे केवळ बनवाबनवी असल्याचे या घटनेवरून सिद्ध होते. राज्यात असे प्रकार घडत राहिले, तर महिला बाहेर पडायलाही घाबरतील, हे सरकारलाकळणे गरजेचे आहे. मुक्ताईनगरमधील ही घटना म्हणजे महिला सुरक्षेच्या अपयशाचे एक ठळक उदाहरण आहे. सरकारने आता तरी कठोर पावले उचलावीत, अन्यथा याचा फटका आगामी निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही.