महाराष्ट्र

Bhandara : शिक्षण क्षेत्रात नवा मैलाचा दगड

CM My School, Beautiful School : उत्कृष्ट शाळांचा गौरव अन् विद्यार्थी सन्मान

Author

भंडाऱ्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 अंतर्गत उत्कृष्ट शाळा आणि निपुण विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. गुणवत्तापूर्ण शिक्षणास चालना देणाऱ्या या कार्यक्रमात शाळांच्या विकासात पालक-सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 पुरस्कार वितरण तसेच निपुण माता पालक गट आणि निपुण विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शाळांचा सन्मान करण्यात आला.  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणाऱ्या निपुण गटांचा गौरव करण्यात आला.

भंडाऱ्याचे पालकमंत्री व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी शासकीय योजना आणि पालकांच्या सक्रिय सहभागातून शाळांचा विकास वेगाने साध्य करता येईल” असे स्पष्ट सांगितले. शाळांमध्ये आधुनिक साधनसामग्रीचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे असल्याचे सांगत, आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शाळांना नव्या शैक्षणिक संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

सन्मानचिन्हे व बक्षीस

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 अंतर्गत पुरस्कार वितरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या 26 जुलै 2024 च्या निर्णयानुसार भंडारा जिल्ह्यातील विविध शाळांचे मूल्यमापन करण्यात आले. गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि शिक्षण प्रक्रियेतील नवकल्पना यांचा विचार करून निवडक शाळांना सन्मानचिन्ह आणि आर्थिक बक्षिसांनी गौरवण्यात आले.

झाडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावत एक लाख 10 हजार रूपये व सन्मानचिन्ह मिळविले आहे.  द्वितीय क्रमांकावर शिवनी (विद्यार्थी विद्या मंदिर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने 50 हजार रुपयांसह सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. रामगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तिसरा क्रमांक पटकावला आणि 30 हजार रूपये व सन्मानचिन्ह मिळविले आहे. या पुरस्कारांमुळे जिल्ह्यातील शाळांना नव्या उंचीवर नेण्याची संधी मिळेल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

निपुण विद्यार्थ्यांचा सन्मान

शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत 2026 पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला तिसरीपर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मिळावे. या उद्दिष्टाने भंडारा जिल्ह्यात ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मूल्यमापन मोहीम राबवण्यात येत आहे. 189 विद्यार्थ्यांना ‘निपुण विद्यार्थी’ म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तर 189 निपुण माता पालक गटांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळावी यासाठी प्रोत्साहनपर बक्षिसे आणि सन्मानचिन्हे देण्यात आली.

समारोप आणि आभार प्रदर्शन

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रविंद्र सलामे यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी सर्व मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा टप्पा मैलाचा दगड ठरेल,” असे त्यांनी सांगितले. या सोहळ्याच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होणार असून, शासनाच्या विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सदर भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता उईके होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर, भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते,  नरेश ईश्वरकर, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती अनिता नलगोपुलवार, समाज कल्याण विभागाच्या सभापती शितल राऊत,  माजी शिक्षण सभापती रमेश पारधी, जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते, नारायण वरठे, वनिता डोये आणि सोमराज गिरडकर यांची उपस्थिती होती.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!