
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या आकाशात विकासाची नवी झेप सुरू झाली आहे. विमानतळापासून ते जागतिक प्रशिक्षण केंद्रापर्यंतचा हा प्रवास विदर्भाच्या भविष्याचा चेहरामोहराच बदलून टाकणार आहे.
अमरावती जिल्ह्यात विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडताच संपूर्ण विदर्भात विकासाच्या नव्या शक्यतांना चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीच्या योजनांमुळे अमरावती आता केवळ एक जिल्हा न राहता, जागतिक पातळीवर उभारणारा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. याच पार्श्वभूमीवर विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावतीच्या भविष्यातील विकास योजनांचा धडाकेबाज आराखडा सादर केला.

सुमारे तीन हजार मीटर लांबीची धावपट्टी उभारून कोणत्याही प्रकारची विमानं उतरू शकतील अशी पायाभूत सुविधा तयार केली जाणार आहे. यामुळे विदर्भात नागपूरनंतर दुसरे मोठे विमानतळ साकारले जाण्याचा मार्ग मोकळा होतो आहे. विमानतळ जिथे उभे राहते तिथे उद्योगांची चाहूल लागते, हे लक्षात घेत फडणवीस सरकारने अमरावतीच्या विमानतळाचा उपयोग उद्योगधंदे, लॉजिस्टिक हब आणि कौशल्यविकास केंद्रासाठी करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
पायलट ट्रेनिंग स्कूल
लोकार्पण सोहळ्यातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे साऊथ ईस्ट एशियातील सर्वात मोठ्या पायलट ट्रेनिंग स्कूलची उभारणी अमरावतीमध्ये होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या प्रशिक्षण केंद्रामुळे केवळ युवकांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार नाहीत, तर अमरावतीसारखा जिल्हा जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर आर्थिक क्रिया वाढणार असून रोजगारनिर्मितीला गती मिळणार आहे.
मोदी सरकारच्या काळात विदर्भाला मिळालेली ही सर्वात मोठी भेट असल्याचेही त्यांनी ठामपणे अधोरेखित केले. ही प्रशिक्षण संस्था आणि विमानतळ यांचा परस्परपूरक विकास अमरावतीस भविष्यातील एव्हिएशन हब म्हणून घडविणार आहे. यातून अमरावती केवळ शिक्षण आणि कृषी क्षेत्रापुरती मर्यादित न राहता, विमान उद्योगातील एक प्रगत केंद्र बनण्याच्या वाटेवर आहे.
रोजगार निर्मितीची दिशा
देशात सात टेक्स्टाइल पार्क उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यातील एक अमरावतीमध्ये सुरू होत आहे. या पार्कमुळे सुमारे दोन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अमरावतीचा पारंपरिक कापूस उद्योग नव्या तंत्रज्ञानाशी जोडला जाणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.
राज्याच्या समृद्धी महामार्गामुळे अमरावती थेट मुंबईशी जोडला गेला आहे. याचबरोबर नवीन उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदराशीही विदर्भ क्षेत्र जोडले जात आहे. या योजनांमुळे पोर्ट लेअर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढेल आणि निर्यातक्षम उत्पादनात विदर्भ आघाडीवर येईल. एकंदरित 7 लाख कोटींचे करार विदर्भासाठी निश्चित करण्यात आले आहे. यामुळे फडणवीस सरकारच्या माध्यमातून विदर्भाच्या औद्योगिक नकाशात भव्य उन्नतीची नांदी घातली जात आहे.