प्रशासन

Buldhana : बनावट नोटांचा गोरखधंदा मोडीत

Vidarbha : बुलढाण्यातील आर्थिक फसवणुकीवर पोलिसांचा कठोर प्रहार

Author

बुलढाणा जिल्ह्यात नकली नोटांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच आरोपींना गजाआड केले. या धडक मोहिमेमुळे आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात नकली नोटांचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. 4 एप्रिलच्या पहाटे लोणार पोलिसांनी विशेष मोहिमेत ही मोठी कारवाई केली. तसेच इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत.

कारवाईमुळे जिल्ह्यात बनावट नोटांचे जाळे उध्वस्त होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक पोलिसांनी समन्वय साधत ही यशस्वी कारवाई केली.

Nagpur : मनपाच्या तिजोरीत मोठी घट

गुप्त माहितीवरून कारवाई

 

लोणार पोलीस मार्च महिन्यापासून या प्रकरणाचा तपास करत होते. 25 मार्च रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, लोणार शहरातील एका व्यक्तीकडे शंभर आणि पाचशे रुपयांच्या नकली नोटांचे व्यवहार सुरू आहेत. त्यानंतर ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हिरदाव चौक येथे सापळा रचण्यात आला.

 

सदर मोहिमेत पोलिसांनी संशयित मोईन खान याला शंभर रुपयांच्या सात नकली नोटांसह रंगेहाथ पकडले. चौकशीत तो लोणारचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 179 आणि 180 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांच्याकडे सोपवण्यात आला.

Chandrapur : माजी नागरसेवकाने आयुक्तांच्या गाडीवर उधळले पैसे

चार साथीदार अटकेत

 

गुन्ह्याचा तपास अधिक खोलवर नेत, पोलिसांनी आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले. या टोळीतील इतर आरोपींमध्ये मोहम्मद अतीक मोहम्मद लुकमान (वय 41, नवी नगरी, लोणार), शेख लुकमान शेख कालू (वय 56, आजाद नगर, लोणार), सैयद मुजाहिद अली सैयद मुमताज अली (वय 23, रोशनपुरा, लोणार)आणि अब्दुल रहीम अब्दुल रशीद (वय 35, सुलतानपुर, ता. लोणार) यांचा समावेश आहे. त्यांना पोलीस कोठडीत ठेवून कसून चौकशी करण्यात येत आहे.

नोटांचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीच्या ताब्यातून 19 नकली 100 रुपयांच्या नोटा आणि इतर एका पार्टीकडून मिळालेला 10 हजार रुपयांचे कमिशन जप्त करण्यात आले आहे. तपासादरम्यान असेही उघड झाले की पोलिसांच्या भीतीने आरोपींनी मोठ्या प्रमाणात नकली नोटा जाळून नष्ट केल्या आहेत.

रॅकेट उघडकीस

कारवाईमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नकली नोटांचे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या टोळीच्या संपर्कातील इतर घटकांचा शोध घेतला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील आर्थिक गैरव्यवहारांवर लगाम बसण्याची शक्यता आहे.

बुलढाणा पोलिसांनी घेतलेली ही कठोर भूमिका जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधात एक मोठे पाऊल मानले जात आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. नकली नोटांचा धंदा करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!