महायुती सरकारने 2024 नंतर तीन अधिवेशनांत शेतकरी कर्जमाफीवर कोणतीही कारवाई न केल्याने विरोधक आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत.
2024 विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेवर आले आणि राज्यात नव्या दमाचे नेतृत्व पाहायला मिळाले. सत्तेवर येताना अनेक गाजावाजा, आश्वासनं, आणि वचनांचा पाऊस झाला. यातील एक महत्त्वाचं वचन म्हणजे ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी’. मात्र, सरकारच्या तीन अधिवेशनांनंतरही या वचनाचा एकही ठसा विधानभवनात उमटलेला नाही. शेतकऱ्यांची आशा होती की सत्तेत आलेल्या महायुतीकडून कर्जमाफी नक्कीच मिळेल. पण हिवाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन. या तिन्ही अधिवेशनांत ‘कर्जमाफी’ शब्दही कुठे ऐकू आला नाही.
दुसरीकडे, सरकारने लाडकी बहीण योजना मात्र अगदी जोशात सुरू केली होती. जिचं आर्थिक नियोजन पंधराशे रुपयांपासून सुरू झाले. ती योजना गेम चेंजर ठरल्याचे नेहमीच सांगण्यात येते.अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वच खात्यांना भरभरून निधी देण्यात आला. पण शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीला मात्र पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं. यामुळे विरोधक आणि शेतकरी दोघेही आक्रमक होत आहेत. शेतकऱ्यांची बाजू घेणारे आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये आठवडाभराचं उपोषण केलं. पण सरकारकडून फक्त घोषणा झाल्या. अद्याप त्या घोषणांची अंमलबजावणी झालीच नाही. सरकारकडून सांगण्यात आलं की योग्य वेळ येईल, आणि कर्जमाफी दिली जाईल. पण ती योग्य वेळ नेमकी कधी येणार? हा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनात असून विरोधक देखील सरकारला याच मुद्यावरून जाब विचारू लागले आहेत.
Yashomati Thakur : पहलगाम हल्ल्यात अनेकांचे जीव गेले, पण हल्लेखोर मोकाट?
समाजाची आर्थिक अवस्था
काँग्रेसचे नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावरून सरकारवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, शेतकऱ्याला सांगितलं कर्जमाफी, शिक्षकाला सांगितलं टप्पा अनुदान, समोर बसलेल्या बहिणींना सांगितलं की समायोजन करू आणि मतदान घेतलं. पण काम मात्र एकाचही केलं नाही. वडेट्टीवार यांनी आश्वासन दिले की, तुमचा समायोजनाचा प्रश्न मी सभागृहात मांडणार, संबंधित मंत्र्यांशी बैठक घेणार. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मी लढत राहणार. ते पुढे म्हणाले की, आता देशातील ८० कोटी लोक रेशनच्या धान्यावर अवलंबून आहेत. ही आकडेवारीच समाजाच्या सध्याच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर भाष्य करते.
महायुतीच्या सरकारने देशाची काय अवस्था केली आहे. यावरून सर्व काही स्पष्ट होतं, असंही त्यांनी ठणकावून सांगितले. वडेट्टीवार यांनी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवरही निशाणा साधला. धर्मांतरण, जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. ख्रिस्ती समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदारावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर, दूधाची भेसळ विधानभवनात आणून काही साध्य होणार नाही. कारवाई करा. अशी सडकून टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट जबाबदारीची जाणीव करून दिली.