
देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपाने जवळपास सगळ्यात संस्था स्वतःच्या ताब्यात केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसची लढाई फक्त भाजप आणि संघाशीच नसून ‘इंडियन स्टेट’शी (भारतीय राज्य यंत्रणा) देखील आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. राहुल गांधी यांच्या या विधानाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. हे विधान राहुल गांधी यांना भारी पडताना दिसत आहे. या विधानामुळे राहुल गांधी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांचे विरोधात गुवाहाटी येथील पान बाजार पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 152 आणि 197(1)d अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताचे सार्वभौमत्व एकता आणि अखंडता धोक्यात आणणाऱ्या कृत्यांसाठी हा गुन्हा दाखल केला जातो.
तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, आरोप तक्रारकर्त्याकडून करण्यात आला आहे. राहुल गांधींचे हे विधान राज्याच्या अधिकाराला अवैध ठरवण्याचा प्रयत्न होता. ज्यामुळे देशात अशांतता आणि फुटीरतावादी भावना भडकवणारे धोकादायक कथा निर्माण होतात, असे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये (FIR) नोंदविण्यात आले आहे.

लोकशाही संस्थांवर जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी एक विरोधी पक्षनेते म्हणून राहूल गांधींची आहे. परंतु त्याऐवजी, त्यांनी भारताची एकता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणून खोटे पसरवण्यासाठी आणि बंडखोरीला चिथावणी देण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर करणे निवडले”, असे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. “लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास संपादन करण्यात असमर्थ ठरल्याने, आरोपी आता केंद्र सरकार आणि भारतीय राज्याविरुद्ध असंतोष भडकावू पाहत आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची भूमिका पाहता हे वर्तन चिंताजनक आहे.”
“ राहुल गांधी यांनी आपला लढा भारतीय राज्याविरुद्ध या विधानातून घोषित दिले आहे. जाणीवपूर्वक विध्वंसक कारवाया आणि लोकांमध्ये बंडखोरी भडकावण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला आहे. हा राज्याच्या अधिकाराला एक विरोधी शक्ती म्हणून चित्रित करण्याचा मोठा प्रयत्न आहे. एक धोकादायक कथा जे अशांतता आणि फुटीरतावादी भावनांना भडकावू शकते”, असे तक्रारीत म्हटले आहे.