महाराष्ट्र

Nagpur Police : नागपूरमध्ये नशेच्या साम्राज्यावर पोलिसांचा वज्रप्रहार

Drugs Free : गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशन ड्रग्स फ्री'चा दणदणीत पहिला अंक 

Author

नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन ड्रग्ज फ्री सिटी’ अंतर्गत मोठी कारवाई करत लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत तिघांना अटक तर दोन आरोपी फरार आहेत.

‘ड्रग्ज फ्री सिटी’ मोहीम अंतर्गत नागपूर पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत शहरात एकाचवेळी तीन ठिकाणी धाड टाकत सुमारे 60 लाखांहून अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. या कारवाईने शहरातील ड्रग्ज सिंडिकेटला मोठा हादरा बसला असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

युनिट क्रमांक 4 मधील पथकाने हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून मेफेड्रेनचा मोठा साठा उघड केला. खोब्रागडे लेआउटमधील ‘आनंद साई रेसिडेन्सी’मधील फ्लॅट क्रमांक 202 येथे पोलिसांनी धाड टाकली असता 456 ग्रॅम मेफेड्रेन (किंमत सुमारे 45 लाख 60 हजार रुपये) हस्तगत करण्यात आले.

मेफेड्रेन जप्ती 

या प्रकरणात धीरज शाम मलिक (वय 31) आणि शुभम परसराम पेंदोर (वय 28) या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, धीरज मलिक हा याआधीच एका गुन्ह्यात फरार घोषित करण्यात आलेला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख 10 हजार 800 रुपये, 20 हजारांचे दोन मोबाईल फोन्स, एक टाटा नेक्सॉन कार, आणि एक अ‍ॅक्टिव्हा दुचाकी असा मिळून एकूण 54 लाख 41 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Nagpur : गांजाचा गंध पोहोचला आयुक्तांपर्यंत; दोन अधिकारी निलंबित

युनिट क्रमांक 5 पथकाने कपिल नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी कारवाई केली. बाबादीप सिंग नगर येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 2 किलो 469 ग्रॅम अफीम (किंमत 4 लाख 93 हजार रुपये) जप्त करण्यात आले. या कारवाईत हरमितसिंग दर्शनसिंग गुरम (वय 47) याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार गौतम फरार आहे. तसेच या ठिकाणाहून रोख 96,700 रुपये, दोन मोबाईल फोन्स (किंमत 21 हजार रुपये) असा 6 लाख 18 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

गांजाच्या जाळ्यात

तिसऱ्या कारवाईत, सक्करदरा पोलिसांनी 9,800 रुपयांचा गांजा जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुशिल उर्फ पोमा उत्तम वाघमारे (वय 20), अमान कलिम शेख (वय 22), शैलेश किशोर माडेवर (वय 40) आणि असलम उर्फ भुऱ्या दाऊद खान (वय 42) यांचा समावेश आहे.

नागपूर पोलिसांनी सध्या ‘ऑपरेशन ड्रग्ज फ्री सिटी’ अंतर्गत शहरात सुरू केलेल्या मोहिमेची ही एक मोठी यशस्वी पायरी मानली जात आहे. या कारवायांमुळे नागपूर शहरातील ड्रग्ज रॅकेटचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे. पुढील तपास अधिक गतीने सुरू आहे आणि उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकांना कामगिरीवर पाठवले आहे.

संपूर्ण कारवाईत पोलिसांची गुप्त माहिती, तत्पर कृती आणि प्रभावी नियोजन यामुळे ड्रग्ज माफियांना मोठा झटका बसला असून शहरात अंमली पदार्थांच्या विरोधातील लढाई अधिक तीव्र होणार, असा विश्वास नागपूर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!