स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच राज्यात प्रशासकीय बदल्यांचा धडाका सुरू झाला आहे. 5 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर करण्यात आले.
राजकीय वातावरण तापले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच राज्यात प्रशासनात मोठे बदल घडताना दिसत आहेत. महायुतीच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांची नवी यादी आज जाहीर केली आहे. मंगळवार, दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी, पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनातर्फे जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये नागपूरपासून मुंबईपर्यंतच्या महत्त्वाच्या पदांवरील बदलांचा समावेश आहे.
नागपूरमध्ये मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी सौ. आशा अफझल खान पठाण (IAS:SCS:9999) यांची बदली वनमाटी (VANAMATI), नागपूरच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरच्या सहसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे. या बदल्यांमुळे नागपूरच्या प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वाचा फेरबदल झाला आहे.
शिस्त लावण्याचा प्रयत्न
मुंबईतही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तुकाराम मुंढे (IAS:RR:2005) यांची विकास आयुक्त (असंगठित कामगार), मुंबई या पदावरून बदली करत सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणच्या प्रशासनाला, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. सरकारी कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसतो. तसेच कार्यालयातील लाल फितीचा कारभार संपवण्यावर मुंढे यांचा भर असतो.
महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ते काम करतात. तुकाराम मुंढेंच्या कारभाराचा सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होत असला तरी राज्यकर्ते आणि प्रशासनातील मुजोर कर्मचाऱ्यांना मात्र ते नकोसे असतात. त्यामुळेच मुंढे यांची काही दिवसांतही बदली झाल्याचं या आधी दिसून आलं.
Nagpur : स्टार्टअप धोरणामुळे ऑरेंज सिटी होणार नवकल्पनांचा हॉटस्पॉट
व्यवस्थापकीय संचालक
नितीन काशिनाथ पाटील (IAS:SCS:2007) यांची महाराष्ट्र राज्य कपाशी उत्पादक संघाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून बदली करत विशेष आयुक्त, राज्य कर विभाग, महाराष्ट्र, मुंबई येथे नियुक्ती झाली आहे. सध्या विशेष आयुक्त (राज्य कर विभाग), मुंबई या पदावर कार्यरत असलेले श्री अभय महाजन (IAS:NON-SCS:2007) यांची बदली करत महाराष्ट्र राज्य कपाशी उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
ओंकार पवार (IAS:RR:2022) यांची बदली सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक येथून करून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक या पदावर करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे राज्यातील महसूल, कर, आणि ग्रामीण विकास यंत्रणेत नव्या जबाबदाऱ्यांसह अधिकाऱ्यांची पुनर्बांधणी झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रशासकीय निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.