
महाराष्ट्राचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या दोन टर्ममध्ये केलेलं काम जागतिकस्तरावर विक्रमी असंच ठरलं आहे. ‘काम बोलतं’ असं मुनगंटीवार यांच्याबाबत म्हटलं जातं. विद्यमान वनमंत्र्यांनीही यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं काम अख्ख्या देशानं पाहिलं आहे. अर्थमंत्री असताना त्यांनी देशाला सर्वांत पहिलं सरप्लस बजेट दिलं होतं. वनमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी राबविलेली वृक्ष मोहिम जागतिक स्तरावर विक्रम नोंदविणारी ठरली. दुसऱ्या टर्ममध्येही वनमंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण ध्वस्त करण्यापासून तर राज्यभरातील वनांना नवी ओळख देण्याचं काम सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. आता त्यांच्या या कामाची विद्यमान वनमंत्री गणेश नाईक यांनीही तोंडभरून स्तुती केली आहे.
नागपूर येथे दौऱ्यावर आलेल्या गणेश नाईक यांनी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या प्रत्येक कामाची यादीच वाचून दाखवली. मुनगंटीवार यांनी मोठ्या प्रमाणात कामं केल्यामुळं देशात महाराष्ट्राच्या वन विभागाला नवं नावलौकिक प्राप्त झाल्याचं नाईक म्हणाले. मुनगंटीवार यांच्यामुळंच राज्यात कोट्यवधी झाडं लागली. हिरवळीचं प्रमाण चौपटीनं वाढलं. वनमंत्री झाल्यानंतर प्रथमच नाईक नागपुरात आलेत. त्यावेळी त्यांनी माजी वनमंत्र्यांनी केलेलं काम किती भरीव होतं, हे सांगितलं.

आणखी Development करणार
नाईक म्हणाले की, मुनगंटीवार यांनी केलेलं काम खरच मोठं आहे. आता तेथुन विकासाचं काम पुढे न्यायचं आहे. गोरेवाडा सेंटरच्या अधिकाऱ्यांची आपण चंद्रपूर येथे भेट घेणार असल्याचं वनमंत्र्यांनी सांगितलं. वर्ड फ्ल्यूच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या प्रकरणातील तथ्य तपासण्यात येतील. खाद्याचीही तपासणी करण्यात येणार असल्याचं नाईक यांनी सांगितलं. या घटनेनंतर प्राणी संग्रहालयातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तपासानंतर वस्तुस्थिती समोर येईल. काही प्राणी संग्रहालयातील भाग तात्पुरता बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही नाईक म्हणाले.
वनांच्या क्षेत्रात अतिक्रमण वाढलं आहे. त्यामुळं मानव-वन्यजीव संघर्ष होत आहे. यासंदर्भात आधीच वन विभागानं धोरण तयार केलं आहे. या धोरणामध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार असल्याचं नाईक म्हणाले. एकूणच गणेश नाईक यांनी माजी वनमंत्र्यांची स्तुती केल्यानं वन विभागानं सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात किती प्रगती केली, याची प्रचिती राज्याला आली आहे. आगामी काळात वन विभागाशी संबंधित निर्णय घेताना सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करण्याची गरज भासली, तर आपण ते नक्कीच करू असंही नाईक यांनी स्पष्ट केलं. नाईक यांनी मुनगंटीवार यांची विदर्भातील आपल्या पहिल्या दौऱ्यातच स्तुती केल्यानं ‘मुनगंटीवार केवल नाम ही काफी है’ असं पुन्हा एकदा बोललं जाऊ लागलं आहे.