भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही महिन्यांपासून बनावट बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र प्रकरणी महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. दरम्यान, वर्धा दौऱ्यावर असताना त्यांना एका नवीन वादाचा सामना करावा लागला.
भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचाराविरोधातील कट्टर लढाई करणारे किरीट सोमय्या देशभरात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या बनावट जन्मप्रमाणपत्रांवरुन मोठा वाद उभा करत आहेत. गेल्या काही महिन्यांत हा विषय राजकीय व सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. किरीट सोमय्या हे संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर भागांमध्ये दौरा करत आहे. ते वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एक नवीन वादसमस्या समोर आली आहे. किरीट सोमय्या हे सोमवारी (16 जून रोजी) वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने आरोप करणारे सोमय्या, यावेळी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या त्यांच्या एका बैठकीचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि नव्या वादाला तोंड फुटले. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सोमय्या थेट खुर्चीत बसलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. विशेषतः शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अभ्यासू लोकांच्या खुर्चीवर असे ऐरे-गैरे लोक बसतातच कसे? असा सवाल करत त्यांनी भाजपच्या प्रशासनाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोमय्यांच्या या कृतीवर काँग्रेससह इतर विरोधकांनीही टीकेची झोड उठवली आहे. मात्र या आरोपांना भाजपकडून तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
त्वरित कारवाईची मागणी
भाजप नेते श्रीधर देशमुख यांनी स्पष्ट केलं की, उपजिल्हाधिकारी त्या वेळी दालनात नव्हते. सोमय्या यांनी त्यांच्या स्टाफसोबत चर्चेसाठी जागा घेतली होती. फोटो नीट पाहिल्यास कोणतीही चुकीची गोष्ट नसल्याचं स्पष्ट होतं, असा दावा त्यांनी केला. भेटीनंतर सोमय्या यांनी जिल्हाधिकारी वॉन्मथी सी. यांची अधिकृत भेट घेऊन वर्ध्यातील रोहिंग्या प्रश्नावर आपली गंभीर भूमिका मांडली. वर्धा जिल्ह्यात जवळपास 800 अनधिकृत रोहिंग्या नागरिक वास्तव्य करत असून, त्यांना जन्म प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आणि मतदार यादीत नाव नोंदणी अशा महत्त्वाच्या कागदपत्रांची सुलभ प्राप्ती झाली असल्याचं त्यांनी निदर्शनास आणले.
सोमय्यांच्या मते, प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीमुळे ही स्थिती उद्भवली आहे. हे दाखले तातडीने रद्द व्हावेत. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कुठलाही सौम्यपणा नको, अशी भूमिका त्यांनी ठामपणे मांडली. त्यांनी अधिकाऱ्यांना कायदेशीर चौकशी आणि कारवाई करण्याचं आवाहन केले आहे. या बैठकीत माजी खासदार सुरेश वाघमारे, जयंत कावळे, अर्चना वानखेडे, श्रीधर देशमुख, प्रशांत बुर्ले, श्रेया देशमुख, वंदना भुते, चित्रा ठाकूर, पल्लवी मोहळकर आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
