महाराष्ट्र

Sunil Mendhe : मेंढे साहेब आले, कोंडीचे ढग पळाले

Highway Issue : भंडाऱ्याला मिळाला हक्काचा बायपास

Post View : 38

Author

माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारामुळे भंडाऱ्याची वाहतूक कोंडी अखेर सुटली आहे. बायपास मार्ग खुला झाल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला.

भंडारा शहरातील सततच्या वाहतूक कोंडीला अखेर माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारामुळे मार्ग मिळाला आहे. भंडारा बायपास मार्गावर वाहतूक सुरू करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शहरातून जाणाऱ्या वाहनांच्या गर्दीत मोठी घट झाली आहे. भंडाऱ्यातील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे.

भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपुऱ्या रस्त्यांमुळे आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत होती. परिणामी, नागरिकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत होता. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांनी आपले प्राणही गमावले. ही गंभीर समस्या लक्षात घेत माजी सुनील मेंढे यांनी खासदार असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीने भंडारा बायपास मार्ग मंजूर करून आणला होता. मात्र, काम संथ गतीने सुरू असल्याने हा मार्ग पूर्णतः कार्यान्वित झालेला नव्हता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना काम आणखी संथावले. नागरिकांच्या वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सुनील मेंढे यांनी आंदोलन करत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.

Sudhir Mungantiwar : लोकशाहीची मशाल पेटवणाऱ्यांना आता मदतीचा दिवा लागतो

परिवर्तन घडणार

सततच्या विलंबामुळे नागरिक त्रस्त झाले असताना सुनील मेंढे यांनी ठोस पावले उचलत बायपास मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करून घेतली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः या मार्गिकेवरील अडथळे दूर केले. रायपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग खुला केला. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या ट्रक आणि जड वाहनांची संख्या अचानक कमी झाली. भंडाऱ्याने मोकळा श्वास घेतला. हे पाऊल उचलल्यानंतर वाहन चालक आणि व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळेल. आता व्यापारास चालना मिळेल आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल.

माजी खासदार सुनील मेंढे यांनी भंडाऱ्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे केली आहेत. भंडारा बायपास मार्ग मंजूर करून आणणे हा त्यांच्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. या मार्गासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. निधी मिळवला. मात्र, काम रखडल्यामुळे त्यांनी स्वतः पुढाकार घेत मार्ग खुला करून दिला, हे त्यांच्या कणखर नेतृत्वाचे उत्तम उदाहरण ठरते. रस्त्यावरील अपुऱ्या सुविधांमुळे व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत होते. भंडाऱ्यातील मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अत्यावश्यक सेवा आणि रुग्णवाहिकांनाही अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर सुनील मेंढे यांच्या त्वरित कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सुनील मेंढे यांनी स्पष्ट केले की, हा बायपास मार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला आहे. त्यांचेच हस्ते त्याचे अधिकृत उद्घाटन करण्यात येईल. मात्र, काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढत होत्या. त्यामुळे या भागातील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेतला, जो शहरवासीयांसाठी अत्यंत फायदेशीर ठरला आहे.

विकासाचे नवे दालन

भंडाऱ्यातील राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक घटकांनी सुनील मेंढे यांच्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे. त्यांच्या तातडीच्या निर्णयामुळे शहरात वाहतूक सुरळीत झाली आहे. भविष्यात संपूर्ण बायपास मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर भंडाऱ्याचा वाहतूक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. माजी खासदार सुनील मेंढे यांच्या धडाडीमुळे भंडाऱ्याने वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळवली आहे. विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!