
बिहारच्या रस्त्यांवर गुन्हेगारांना थरथर कापवणारा ‘IPS सिंघम’ आता जनतेच्या मनात परिवर्तन घडवण्यासाठी राजकारणात उतरला आहे. शिवदीप लांडे यांनी ‘हिंद सेना’ पक्षाची स्थापना करून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.
एकेकाळी बिहारच्या रस्त्यांवर गुन्हेगारांचे थरकाप उडवणाऱ्या, “दबंग आयपीएस” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवदीप लांडे यांनी अखेर राजकारणाच्या रणांगणात दमदार प्रवेश केला आहे. महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यात जन्मलेल्या आणि बिहारमध्ये पोलिस अधिकारी म्हणून लौकिक कमावलेल्या लांडे यांनी आज एका भव्य पत्रकार परिषदेत आपल्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. त्यांनी ‘हिंद सेना’ या नव्या पक्षाच्या माध्यमातून तरुणाईच्या आशा-अपेक्षांचा आवाज बनण्याचा निर्धार व्यक्त केला.

काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आयपीएस पदाचा राजीनामा दिला होता. 19 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस दलातून निवृत्ती घेतल्यानंतर, त्यांनी बिहारमधील जनतेसाठी कार्यरत राहण्याचा निश्चय व्यक्त केला होता. तेव्हापासूनच त्यांच्या राजकारणात प्रवेशाची चर्चा सुरु होती, जी अखेर सत्यात उतरली.
युवक गोंधळलेले
पत्रकार परिषदेत बोलताना लांडे म्हणाले, मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा ‘जय हिंद’ बोलून सुरुवात केली होती. आज त्याच भावनेनं, त्याच जोमानं मी राजकारणात उतरलो आहे. देशातील युवक उदास आणि गोंधळलेले आहेत. त्यांना दिशा दाखवण्याची गरज आहे. आमचा पक्ष ‘हिंद सेना’ हा युवकांचा पक्ष असेल. युवकांसाठी, युवकांच्या माध्यमातून काम करणारा एक सक्रिय मंच.”
शिवदीप लांडे यांचा बिहारशी भावनिक संबंध निर्माण झाला होता. बिहार माझं कुटुंब आहे. मी 18 वर्ष इथल्या जनतेची सेवा केली. जर माझ्याकडून काही चुकलं असेल, तर मी बिहारच्या जनतेची क्षमा मागतो. पण आता राजकारणाच्या माध्यमातून त्यांच्या सेवेत राहणार आहे, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली होती, जी अत्यंत भावनिक ठरली होती.
कोण आहेत शिवदीप लांडे?
29 ऑगस्ट 1976 रोजी जन्मलेले शिवदीप लांडे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लांडे यांनी आपले प्राथमिक शिक्षण अकोलातच पूर्ण केले. त्यानंतर शेगावच्या श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.टेक केलं. इंजिनिअरिंगनंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी मुंबई गाठली आणि 2006 मध्ये ते आयपीएस म्हणून निवडले गेले.
शिवदीप लांडे यांची नियुक्ती बिहारमध्ये झाली आणि काही काळातच ते कठोर, निर्भीड आणि प्रामाणिक अधिकाऱ्याच्या रूपात उभे राहिले. गुन्हेगारी विरोधातील त्यांच्या कारवाईमुळे ते “सिंघम” म्हणून प्रसिद्ध झाले. विशेषतः तरुणांमध्ये त्यांच्या लोकप्रियतेला अलौकिक उंची मिळाली होती. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे लांडे जावई आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही लांडे यांचे नाव अनेकदा चर्चेत राहिले आहे. मात्र त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून बिहारच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता नजर निवडणुकांवर
शिवदीप लांडे यांचा पक्ष ‘हिंद सेना’ आगामी बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये आपले पहिले पाऊल टाकणार आहे. सध्या ते विविध जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याच्या कामात व्यस्त आहेत. स्थानिक पातळीवर युवकांचा मोठा पाठिंबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
“सिंघम आता राजकारणात” हे वाक्य आता केवळ उपमा न राहता वास्तवात उतरले आहे. शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वात ‘हिंद सेना’ बिहारच्या राजकारणात काय धमाका करते, हे पाहणं निश्चितच रंजक ठरणार आहे.