राजकीय दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. साहेबांची आणि दादांची राष्ट्रवादी येथे पुन्हा आमने-सामने आली आहे. यातून माजी आमदारानं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.
धानपट्टा असलेल्या भंडाऱ्यात सध्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुमशान सुरू होण्याची चिन्हे आहेत. बीआरएसच्या मोटारीतून उतरून साहेबांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या माजी आमदार चरण वाघमारे यांनी दादांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ कसं बंद पाडता येईल, याची व्यूहरचना आखणं सुरू केलं आहे. दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना ‘कानुन के शिकंजे’में पकडण्यासाठी वाघमारे यांनी आपले ‘चरण’ पुढे टाकले आहे.
आमदार राजू कारेमोरे यांनी आतापर्यंत बरेच कारनामे केले आहेत. त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्ह्यांची नोंद आहे. परंतु या गुन्ह्यांचा खटला चालत नसल्याचं वाघमारे यांचं म्हणणे आहे. त्यामुळं त्यांन थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. कारेमोरे यांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत दखल घ्यावी. या सगळ्या गुन्ह्यांचे खटले ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालवावे, अशी मागणी देखील माजी आमदार वाघमारे यांनी केली आहे.
नव्या शिकारीची तयारी
गुन्ह्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित साहेबांच्या माजी आमदारानं आता दादांच्या शिलेदाराची ‘शिकार’ करण्याची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. वाघमारे यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना याबाबत निर्देश दिल्यास वाघमारे असलेले चरणभाऊ कारेमोरे यांच्याशी अचूक निशाणा साधण्यात नक्कीच यशस्वी होतील, असं सांगण्यात येत आहे. कारेमोरे यांच्या विरोधात असलेल्या तीन गुन्ह्यांचा तपशिल वाघमारे यांनी पत्रासोबत जोडला आहे. हे गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळं त्याच्याकडं सरकारनं दुर्लक्ष करू नये, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
वाघमारे यांनी पाठविलेल्या या पत्रामुळं भंडाऱ्यातील जनतेला वाघमारे व्हर्सेस कारेमोरे असं राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले वाघमारे आणि कारेमोरे यांच्यातील ही रस्सीखेच भविष्यात कोणतं रुप घेणार, यासंदर्भात भंडाऱ्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. चरण वाघमारे यांना आपल्यासोबत घेत शरद पवार यांनी पूर्व विदर्भात अजित पवारांचं नेटवर्क विस्कळीत करण्याची योजना आखली होती. पवारांची ही योजना यशस्वी होत असल्याचे एकूणच घडामोडीवरून दिसत आहे. दोन नेत्यांमध्ये असलेल्या या स्पर्धेमुळं भंडाऱ्यात शुकशुकाट असलेल्या साहेबांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनाही बळ मिळालं आहे. आमदार राजू कारेमोरे यांच्या विरोधात असलेल्या अनेकांनी वाघमारे यांनी माहितीची रसद पुरविण्यासही सुरुवात केली आहे.
वाघमारे यांच्याकडून भंडाऱ्यात सुरू असलेली आजपर्यंतची राजकीय वाटचाल पाहता, ते राजू कारेमोरे यांच्या राजकीय एक्स्प्रेसला ‘लाल बावटा’ दाखवतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना सध्या कारेमोरेंना ‘राजूभाऊ जरा चरणभाऊंपासून जपूनच’ असा सल्ला देण्यास सुरुवात केली आहे.