महाराष्ट्र

Buldhana & Amravati : शिक्षण विभागाचं बॅक टू स्कूल मिशन सुरू 

Education Department : गणवेशाच्या धाग्यात गुंफलेलं भविष्याचं स्वप्न 

Share:

Author

23 जूनपासून राज्यातील शाळांना नवा शैक्षणिक टर्न मिळणार आहे. बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार आहेत पुस्तकं, गणवेश, बूट आणि पायमोज्यांची स्वागतखुली भेट.

सप्तरंगांच्या स्वप्नांवर स्वार होत, हातात पुस्तकं आणि पायात नव्या जोडीचे बूट घालून, विद्यार्थ्यांची पावलं पुन्हा एकदा शाळेकडे वळणार आहेत. 23 जूनला शाळेची पहिली घंटा वाजणार असून, यंदाचा हा पहिला दिवस केवळ शिक्षणाच्या प्रवासाचा नव्हे, तर सन्मानाने सजलेल्या आत्मविश्वासाचा उत्सव ठरणार आहे.

राज्यातील इतर भागांप्रमाणेच बुलडाणा आणि अमरावतीतील दर्यापुरातही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 23 जूनपासून होणार आहे. विशेष बाब म्हणजे, बुलढाण्यात यंदा पहिल्याच दिवशी तब्बल दोन लाख 44 हजार 238 विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकाच नव्हे, तर नवीन गणवेश, बूट आणि सॉक्स मिळणार आहेत.

पालकांच्या चिंता दूर

शालेय गळती रोखणे, उपस्थिती वाढवणे आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणे हे समग्र शिक्षा अभियानाचे मूळ उद्दिष्ट असून, यासाठीच राज्य सरकारने जवळपास ७ कोटी ३५ लाखांचा निधी शिक्षण विभागाच्या माध्यमातून वितरित केला आहे. 14 लाखांहून अधिक पुस्तके शाळांमध्ये पोहोचली आहेत.  पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ती मिळणार असल्याने पालकांच्या चिंता दूर झाल्या आहेत

एक लाख 56  हजार 509 पात्र विद्यार्थ्यांकरिता एकूण २ कोटी 66 लाख 6 हजार 530 रुपये बूट व सॉक्ससाठी आणि 4 कोटी 44 लाख 94 हजार 200 रुपये गणवेशासाठी वितरित करण्यात आले आहेत. शाळेच्या व्यवस्थापनास व मुख्याध्यापकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी आवश्यक सर्व साहित्य मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), बुलडाणा उमेश जैन यांनी सांगितले.

Nitin Gadkari : काँग्रेसने देश थांबवला आम्ही धावता केला

नव्या हुरुपाने शाळांची तयारी 

दुसरीकडे, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील 142 शाळांमध्येही नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सहा हजार 578 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश, बूट आणि दोन जोड पायमोजे मिळणार आहेत.

या उपक्रमासाठी 19 लाख 73 हजार 340 रुपये गणवेशासाठी आणि 11 लाख 63 हजार 990 रुपये बूट-सॉक्ससाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये एससी, एसटी आणि बीपीएल घटकांतील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश मिळावा, हीच शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे म्हणाले.

निधीचा प्रश्नही गंभीर 

शासनाने एकीकडे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची पूर्तता करून देण्याचा निर्णय घेतला असला, तरी काही पालक व शिक्षकांनी 300 रुपयांत गणवेश आणि 170 रुपयांत बूट-सॉक्स खरेदी करणे ही मोठी अवघड बाब असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शासनाने दिलेला निधी स्वागतार्ह आहे, पण महागाईच्या तुलनेत तो अपुरा वाटतो. शासनाने या निधीत वाढ करावी, म्हणजे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना फायदा मिळेल, असे बोलले जात आहे.

या उपक्रमामुळे राज्यभरातील शाळांप्रमाणेच बुलडाणा आणि दर्यापूरमध्येही शाळेचा पहिला दिवस उत्साहात पार पडणार आहे. हातात पुस्तकं, अंगावर नवा गणवेश, पायात बूट आणि चेहऱ्यावर आनंद, शिक्षणाच्या या नव्या प्रवासाची ही एक सुंदर सुरुवात ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!