महाराष्ट्र

Gadchiroli : प्रतीक्षा संपली, गडचिरोलीच्या हातात आले विकासाचे पोस्टकार्ड

Post Office : अनेक वर्षांनी मिळालेला टपाल स्वाभिमानाचा विजय

Author

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्याच्या नावावर अखेर स्वतंत्र डाक विभागाची मोहर उमटली आहे. २८ जुलै रोजी केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या प्रवासात ऐतिहासिक पानाची नोंद झाली आहे.

डोंगर-दऱ्यांतून वाट काढत, झाडांवर चिठ्ठ्या बांधत, आणि ओढ्यांवरून पत्रं वाहत गडचिरोलीत पोहोचणाऱ्या टपाल सेवेचा इतिहास केवळ तांत्रिक नव्हे, तर भावना आणि प्रतीक्षेचा आहे. अखेर 43 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्याला स्वतंत्र डाक विभागाची मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या टपाल विभागाने 28 जुलै 2205 रोजी अधिकृत पत्र जारी करत गडचिरोलीला ‘स्वतंत्र डाक विभाग’ म्हणून घोषित केलं. यानंतर लवकरच जिल्ह्यात स्वतंत्र मुख्य पोस्ट ऑफिस उभारलं जाणार असून, हे पाऊल गडचिरोलीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जाणार आहे.

आजवर गडचिरोली जिल्ह्याचा टपाल कारभार चंद्रपूर डाक विभागांतर्गतच चालवला जात होता. चंद्रपूरचे 15 आणि गडचिरोलीचे १२ तालुके या एकत्रित विभागात सामील होते. अहेरी, सिरोंचा, भामरागड यांसारख्या अतिदुर्गम भागांमध्ये टपाल सेवा पोहोचवताना कर्मचाऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावं लागायचं. अनेक वेळा नागरिकांना तक्रारींसाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी चंद्रपूरला जावं लागायचं. परिणामी, वेळ, पैसा आणि मेहनत वाया जात होती.

Shalartha ID scam : एसआयटीने फोडली शिक्षण विभागाच्या फसव्या तिघांची साखळी

अधिकृत पत्र जारी

गडचिरोलीसाठी स्वतंत्र टपाल विभागाची मागणी गेल्या अनेक दशकांपासून सुरू होती. भारतीय पोस्टल एम्प्लॉईज असोसिएशन या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच चंद्रपूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील विविध लोकप्रतिनिधींनीही या मागणीला पाठबळ दिलं. अखेर महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या नावे केंद्र सरकारच्या टपाल विभागाने अधिकृत पत्र जारी करत ही ऐतिहासिक मान्यता जाहीर केली.

या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्याला प्रशासकीय स्वायत्तता लाभणार आहे. स्थानिक पातळीवरच निर्णय घेता येतील, सेवा अधिक गतिमान आणि सुलभ होतील. नागरिकांना आधार सेवा, पोस्टल बँक, स्पीड पोस्ट, बचत योजना अशा विविध सेवा आता स्वतःच्या जिल्ह्यात उपलब्ध होणार आहेत. विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Political War : नऊ सप्टेंबरला मतपेटी बोलेल दिल्ली दरबाराचा ‘नंबर टू’ कोण?

प्रगतीला नवे बळ

गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, दुर्गम आणि संवेदनशील जिल्ह्याला स्वतंत्र डाक विभागाची गरज केवळ सेवा सुधारण्यासाठीच नव्हती, तर तो एक आत्मसन्मानाचा विषय होता. जिल्ह्याची निर्मिती 1982 मध्ये झाली, पण आजपर्यंत डाक विभाग स्वतंत्र नव्हता. त्यामुळे प्रशासनिक बाबींमध्ये विलंब होत होता. आता या निर्णयामुळे गडचिरोलीचा टपाल विभाग स्वतंत्र होणार आहे आणि त्यासोबतच जिल्ह्याच्या प्रगतीला नवे बळ मिळणार आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या प्रवासात हे एक महत्त्वपूर्ण वळण ठरणार आहे. नवीन मुख्य पोस्ट ऑफिस उभारणीसह प्रत्येक तालुक्यात सेवा अधिक सशक्त करण्यात येईल. ही केवळ व्यवस्था नव्हे, तर गडचिरोलीच्या स्वाभिमानाचा सन्मान आहे. आता ‘गडचिरोलीचा पत्ता’ हा केवळ नकाशावरील ठिकाण न राहता, केंद्र सरकारच्या रेकॉर्डमध्ये एक स्वतंत्र विभाग म्हणून नोंदला जाणार आहे.

एकूणच, २८ जुलै २०२५ हा दिवस गडचिरोलीच्या डाक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. हा निर्णय टपालसेवेपलीकडे जाऊन गडचिरोलीच्या एकात्म विकासाचा भाग ठरेल. आता प्रत्येक पोस्टमन जेव्हा ‘गडचिरोली डिव्हिजन’च्या नावाने चिठ्ठी पोहोचवेल, तेव्हा त्या प्रत्येक चिठ्ठीत फक्त अक्षरं नव्हे, तर इतिहास लिहिला जाईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!