
गडचिरोली जिल्ह्यातील धान बोनस घोटाळ्याने पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. चामोर्शी खरेदी विक्री संघाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रातील ठिकठिकाणी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या धान, तांदूळ व इतर शेतमाल संबंधित आर्थिक गैरव्यवहाराने राज्याचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या मुद्द्याने जोरदार गदारोळ निर्माण केला होता. दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याच प्रकरणात आता गडचिरोलीतील चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांवर धान बोनस वाटपातील कथित भ्रष्टाचारामुळे गुन्हे दाखल होण्याची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल मिळाल्यानंतर ही कारवाई सुचवण्यात आली आहे.
समितीने उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करून धान बोनस वितरणामध्ये गंभीर अनियमितता झाल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार दाखल केली होती. त्यांच्या दाव्यानुसार, चामोर्शी तालुक्यातील खरेदी विक्री संघाने भूमिहीन नागरिकांच्या नावावर बनावट शेती दाखवून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी 40 हजार रुपयांचा बोनस जमा केला. वास्तविक लाभार्थ्यांना केवळ दोन-तीन हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम अन्यत्र वळवण्यात आली.

Vijay Wadettiwar : जातनिहाय जनगणना मंजूर होताच विरोधकांनी उचलला सूर
बनावट लाभार्थ्यांची यादी
पिपरे यांनी अशा अनेक बनावट लाभार्थ्यांची यादी सादर करत खात्यांची चौकशी करण्याची मागणी केली. प्राथमिक तपासातही या प्रकाराला दुजोरा मिळाला आहे. अनेक बोगस खात्यांत पैसे जमा करून गैरमार्गाने रकमेचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष करणारे जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे स्वतःही अडचणीत आले आहेत. अनेक वेळा तक्रारी देऊनही त्यांनी कारवाई का केली नाही, यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तिवाडे यांना नोटीस बजावून खुलासा मागवला आहे.
चौकशी समितीच्या अहवालात त्यांचाही संभाव्य सहभाग असल्याचा उल्लेख आहे. चौकशी अहवालानुसार, धान बोनस वाटपात प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट अनियमितता आढळून आली आहे. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केटिंग अधिकाऱ्यांना चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. धान खरेदी, भरडाई आणि तांदूळ तस्करीसारख्या प्रकरणांमुळे आधीच राज्य शासनाला कोट्यवधींचा फटका बसलेला आहे. अशातच शेतकऱ्यांच्या हक्काच्या बोनस वाटपातही भ्रष्टाचार घडल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप पसरला आहे. ज्या शेतकऱ्यांना आधार मिळायला हवा होता, त्यांच्याच नावावर पैसे घेतले गेले, हे दुर्दैव म्हणावं लागेल.