गडचिरोलीच्या जंगलात माओवाद्यांचा डाव कोलमडला. जहाल नक्षलवादी शंकर भिमा महाका पोलिसांच्या जाळ्यात अडकताच माओवादी संघटनेत खळबळ उडाली.
गडचिरोलीच्या घनदाट जंगलांमध्ये माओवादी कारवायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने आपली अचूक रणनीती आणि अथक परिश्रमाने पुन्हा एकदा यश संपादन केले आहे. भामरागड परिसरातील तिरकामेटा जंगलात रेकी करणाऱ्या एका जहाल माओवाद्याला पोलिसांनी खणखणीत कारवाई करत ताब्यात घेतले. या कारवाईने माओवादी गटांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस दलाच्या चतुरस्र कामगिरीचे कौतुक होत आहे. ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. ज्याने देशविघातक शक्तींविरुद्धच्या लढ्याला बळकटी दिली आहे.
भामरागड उपविभागातील ताडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 सप्टेंबरला विशेष अभियान पथकाने जंगलात गस्त घालत असताना संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. प्राणहिता उपमुख्यालयात सखोल चौकशी केल्यानंतर या व्यक्तीची ओळख शंकर भिमा महाका, वय 32, अशी झाली. हा जहाल माओवादी भामरागड दलमचा सक्रिय सदस्य आहे. त्याने अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग घेतला होता. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासातील एका खुनाच्या गुन्ह्यातही तो फरार होता.
माओवादी कारवायांचा कर्दनकाळ
शंकर भिमा महाका हा 2016 पासून माओवादी संघटनेत सक्रिय होता. सुरुवातीला जनमिलिशिया म्हणून कार्यरत असलेला हा नक्षलवादी 2021-22 मध्ये भामरागड दलमचा सदस्य बनला. त्याने परायनार आणि आसपासच्या जंगल परिसरात पोलिसांच्या हालचालींवर पाळत ठेवून माहिती गोळा करण्याचे काम केले. 2022 मध्ये धोडराज ते पेनगुंडा रस्त्यावरील 19 वाहनांच्या जाळपोळीत आणि 2023 मध्ये पेनगुंडा येथील एका निरपराध व्यक्तीच्या खुनात त्याचा थेट सहभाग होता. याशिवाय, त्याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल आहेत.
Harshwardhan Sapkal : शेतकरी रडतो अन् सरकार बघ्याची भूमिका घेतं
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली गेली. विशेष अभियान पथकाने आपल्या धैर्याने आणि चिकाटीने माओवाद्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पणाचे आवाहन केले आहे. गडचिरोली पोलीस दलाची ही यशस्वी मोहीम माओवादविरोधी लढ्याला नवी दिशा देणारी ठरेल.