गडचिरोली पोलीस दलाच्या दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत 40 दिवसीय पोलीस भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाले. या 12व्या सत्रात 125 युवक-युवतींनी सहभाग घेतला व निरोप समारंभ उत्साहात पार पडला.
गडचिरोलीच्या मातीतून स्वप्नांच्या उंच भरारी घेण्यासाठी पोलीस दादालोरा खिडकीने पुन्हा एकदा तरुणांना प्रेरणा दिली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या या अनोख्या उपक्रमाने 125 युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा ‘फिटनेस मंत्र’ शिकवत, त्यांच्या स्वप्नांना बळ दिले. 40 दिवसांच्या या निवासी प्रशिक्षणाचा रंगारंग निरोप समारंभ नुकताच एकलव्य हॉल, पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे पार पडला. या सोहळ्याचे खरे हिरो ठरले ते म्हणजे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, ज्यांनी आपल्या प्रेरक मार्गदर्शनाने तरुणांच्या मनात आत्मविश्वासाचा ज्वालामुखी पेटवला.
6 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर या कालावधीत चाललेल्या या प्रशिक्षणात तरुणांना मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, सायबर जागरूकता, नवीन कायद्यांचे महत्त्व आणि महिला गुन्ह्यांबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले. गडचिरोली पोलीस दलाने या 125 ‘स्वप्नवीरांना’ लोअर, टी-शर्ट, शूज, अभ्यासासाठी पुस्तके आणि इतर साहित्य मोफत पुरवले. निरोप समारंभात नीलोत्पल यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या तरुणांनी आपल्या मनोगतातून गडचिरोली पोलीस दलाच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. तसेच भरतीत यशस्वी होण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला.
East Vidarbha : नानांच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये सपकाळांचे जोरदार कॅम्पेन
तरुणांचा आत्मविश्वास
गडचिरोली पोलीस दलाचा हा 12 वा प्रशिक्षण तुकडा होता. आतापर्यंत 2 हजार 318 युवक-युवतींनी या उपक्रमातून आपली स्वप्ने साकारण्यासाठी पावले टाकली आहेत. यापैकी 205 जणांनी शासकीय सेवेत स्थान मिळवले आहे. याशिवाय, ‘एक गाव, एक वाचनालय’ उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात 72 सुसज्ज वाचनालये उभारली गेली आहेत. 2021 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत तब्बल 11 लाख 1 हजार 14 नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. नीलोत्पल यांनी प्रशिक्षणार्थ्यांना ‘पुढील 100 दिवस जिद्द, मेहनत आणि चिकाटीने यशाचा किल्ला सर करा,’ असा प्रेरणादायी संदेश दिला. मैदानी मेहनतीसोबत अभ्यास आणि जागतिक घडामोडींची अद्ययावत माहिती ठेवण्याचा मंत्रही त्यांनी दिला.
Ajit Pawar : चांद्यापासून बांद्यापर्यंत संघटना बळकटीकरणाचे ध्येय
गडचिरोलीतील या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी, नागरी कृती शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके आणि सर्व प्रशिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज यांनीही प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. गडचिरोलीच्या या तरुण स्वप्नवीरांनी आता पोलीस भरतीच्या रणांगणावर उतरण्याची तयारी केली आहे. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे यश निश्चित आहे.