
गडचिरोली जिल्ह्यात ड्रोन आणि इतर मानवरहित हवाई यंत्रांवर 15 दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे.
देशाच्या सुरक्षेला धोका ठरू शकणाऱ्या दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आणि इतर मानवरहित हवाई यंत्रांच्या वापरावर 15 दिवसांसाठी संपूर्ण जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश 20 मे 2025 पासून लागू आहे. तो 03 जून 2025 पर्यंत राहणार आहे.

सदर आदेश भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 अंतर्गत लागू करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी नीलोत्पल यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. देशविरोधी शक्तींनी हवाई मार्गाचा वापर करून गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, ही निर्णायक पावले उचलण्यात आली आहेत.
Maharashtra : गिरणीच्या यंत्रातून सुरू होतोय स्त्रियांच्या स्वप्नांचा प्रवाह
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण होणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी घटक ड्रोन किंवा अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर हल्ले करू शकतात. यामध्ये केवळ मानवी जिविताच नाही, तर महत्त्वाची सरकारी मालमत्ता, अत्यावश्यक सेवा केंद्र आणि अन्य संवेदनशील भागांनाही धोका निर्माण होतो. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून संवेदनशील भागात अशा उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यात 15 दिवसांसाठी या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाद्वारे कोणत्याही व्यक्तीस पोलीस अधीक्षकांची विशिष्ट लेखी परवानगी नसताना ड्रोन, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर यांसारखी यंत्रणा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने वैयक्तिक नोटीस देणे शक्य नसल्यामुळे एकतर्फी आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश प्रसारमाध्यमांद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नोटीस बोर्डावर प्रदर्शित केला जाईल. आदेश सामान्य जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने जारी करण्यात आला आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता कलम 223अंतर्गत तसेच इतर लागू असलेल्या कायद्यांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Nagpur Police : ऑपरेशन थंडरच्या माध्यमातून आयुक्तांचा आक्रमक अवतार
जबाबदारीची गरज
गडचिरोली जिल्हा अनेकदा देशविरोधी कारवायांचा धक्का सहन करत आलेला आहे. त्यामुळे अशा तांत्रिक साधनांचा वापर कोणत्याही अप्रत्याशित परिस्थितीला जन्म देऊ शकतो, म्हणूनच प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. हा निर्णय केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठीदेखील महत्त्वाचा ठरणार आहे. अशा कठोर निर्णयामुळे गडचिरोलीसारख्या भागात स्थिरता आणि शांती प्रस्थापित होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.