मद्यबंदी असूनही गडचिरोलीत अवैध देशी-विदेशी दारूचा महासाठा वाहतूक मार्गाने हलवला जात होता. मात्र पोलिसांच्या अचूक सापळ्याने लाखोंचा हा नशेचा कारवां पकडण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील मद्यबंदी आणि निषेधाज्ञेच्या पार्श्वभूमीवर, बेकायदेशीर मद्यसाठा आणि त्याचा व्यापार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर मोहीम उघडली आहे. याचाच एक भाग म्हणून, स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशावरून एक मोठी आणि परिणामकारक कारवाई केली आहे. बेकायदेशीर देशी-विदेशी दारूचा साठा आणि वाहतूक थांबवण्यासाठी 29 जुलै 2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे पुराडा मार्गावर सापळा रचण्यात आला होता.
या कारवाईदरम्यान, MH-18-BZ-7477 क्रमांकाच्या आयशर वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये तब्बल 85 पेट्या विदेशी ‘टँगो पंच’ दारू आणि 565 पेट्या देशी ‘रॉकेट’ दारू आढळून आल्या. एकूण दारूचा अंदाजे बाजारमूल्य 52 लाख रुपये इतका आहे. तर वाहन, मोबाईल व इतर साहित्य धरून एकूण मुद्देमालाची किंमत 67 लाख 20 हजार रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. ही कारवाई बेकायदेशीर दारू माफियांना पोलिसांकडून मिळालेली जोरदार चपराक म्हणावी लागेल.
Anil Deshmukh : सूड घेण्यासाठी आधी ईडीचा तडका, आता ‘जनसुरक्षा’चा दणका
गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी जितेंद्र शंकर लोहार (रा. येंगलखेड़ा) आणि रोशन दुग्गा (रा. चिचेवाडा) या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम 1949 अंतर्गत कलम ६५(अ), ९८(२), ८३ नुसार पुराडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींकडून अधिक माहिती घेतली जात आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश व गोकुलराज तसेच एसडीपीओ अरुण फेगडे आणि डीवायएसपी रवींद्र भोसले यांच्या नेतृत्वात पार पडली. त्यांची योजना, सहकार्य व तत्परता यामुळे ही कारवाई अत्यंत प्रभावी झाली. गडचिरोली सारख्या संवेदनशील भागात बेकायदेशीर दारू तस्करी हा एक गंभीर मुद्दा असून, पोलिसांच्या अशा कृतींमुळे या गैरव्यवसायांना चाप बसण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दाखवलेली तत्परता, नियोजन आणि निर्णयक्षमता निश्चितच कौतुकास्पद आहे.