गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्रात भक्ती आणि उत्साहाचा रंग चढला आहे. यंदा सण राजकारणाशी मिसळत महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षांच्या विजयाची तयारीही रंगात दिसत आहे.
महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा उत्साह संपूर्ण वातावरणात पसरला आहे. ‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया’ असा जयघोष प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात घुमतोय. सनई-चौघड्यांचा मंगलमय नाद आणि बाप्पाच्या स्वागताची लगबग यंदा केवळ आनंदाचीच नाही, तर राजकीय रंगांनी नटलेली आहे. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर आणि राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन एकाचवेळी दिसत आहे. यंदा बाप्पाच्या आगमनासोबतच महापालिका निवडणुकीचा बिगुलही वाजण्याच्या तयारीत आहे.
सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लवकरच घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बाप्पाच्या या उत्सवात राजकारणाचे रंगही उधळले जाणार आहेत. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सिद्धिदाता. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी त्याचे स्मरण केले जाते. यंदा मात्र बाप्पाच्या या आगमनाला विशेष महत्त्व आहे. कारण महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्षाला बाप्पाच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे. मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे राजकीय शक्ती प्रदर्शनाचा रंग चढताना दिसतोय.
RSS: विविधतेच्या रंगात रंगलेला भारत, एकतेच्या सूरात गुंजलेला आत्मा
बाप्पा आणि विजयाचा संगम
राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बैठका, मोर्चे, आणि पक्षांतराची मालिका यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. बाप्पाच्या मंडपात आनंदाचा हार आणि विजयाचा हार एकत्र गुंफला जाणार आहे. विदर्भ, जिथे भाजपचा बालेकिल्ला अढळ आहे, तिथेही राजकीय नाट्य कमी नाही. महायुती सरकार 2024 विधानसभा विजयानंतर महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे. नव्या योजनांना हिरवी झेंडी दाखवत, शक्तिप्रदर्शन आणि मोर्चे बांधणी यात महायुती पूर्णपणे गुंतली आहे. याउलट, महाविकास आघाडीची अवस्था बिकट दिसते.
आधीच विधानसभा निवडणुकीच्या अपयशाचा लाडू विरोधकांना पचायला अवघड जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाहेर पडण्याने शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढत असले, तरी पक्षांतराची सततची मालिका त्यांना हैराण करत आहे. राज ठाकरे यांच्या मनसेचीही अवस्था काहीशी अस्थिरच आहे.गणेशोत्सवाच्या या रंगतदार वातावरणात प्रत्येक राजकीय नेता बाप्पाच्या मूर्तीसमोर विजयाची माळ घालण्यासाठी प्रार्थना करताना दिसतोय. मंडपांमध्ये भक्तीचा गजर आणि राजकीय रणधुमाळी यांचा संगम यंदाचा उत्सव अविस्मरणीय बनवतोय. बाप्पाच्या आशीर्वादाने कोणता पक्ष निवडणुकीच्या रणांगणात यशाचा मोदक घेऊन जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गणरायाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा नाद आणि राजकीय जोश यंदा एकमेकांत गुंफला आहे. हा उत्सव केवळ भक्तीचा नाही, तर राजकारणाचा रंगमंच ठरतोय.
