मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांनी नागपूरच्या विकासाला गती देण्यासाठी अनेक नवे प्रयोग आणि उपक्रम शहरात आणले आहेत.
उपराजधानी नागपूर, एक शहर ज्याची ओळख अनेक नावांनी आहे. स्मार्ट सिटी, ऑरेंज सिटी, मेट्रो सिटी, आयटी हब आणि आता लवकरच जागतिक दर्जाच्या टेक्नॉलॉजीचे नवे केंद्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांना ‘देवाभाऊ’ म्हटल्या जाते, त्यांनी आपल्या गृहनगराला विकासाच्या शिखरावर नेण्याचा संकल्प पुन्हा एकदा दाखवला आहे. नागपूरच्या मातीत आता स्पेनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची पेरणी होणार आहे. येथे उभारले जाणार आहे एक भव्य आणि आधुनिक कन्व्हेन्शन सेंटर. जे नागपूरच्या वैभवाला नवा आयाम देणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नागपूरच्या विकासाला त्यांनी प्राधान्य दिले आहे. मग ते परदेश दौरे असोत किंवा गुंतवणूकदारांशी चर्चा.
प्रत्येक वेळी ते नागपूरसाठी काहीतरी खास भेट घेऊन येतात. यंदाही त्यांनी स्पेनमधील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत सामंजस्य करार करत नागपूरला जागतिक दर्जाची भेट दिली आहे. या करारामुळे नागपूरला एक असे कन्व्हेन्शन सेंटर मिळणार आहे, जे केवळ प्रदर्शनांचे ठिकाण नसून, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे. मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या या सामंजस्य कराराच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाची रूपरेषा मांडली. त्यांनी सांगितले की, हे कन्व्हेन्शन सेंटर सर्व परिवहन सुविधांनी जोडलेले असावे आणि त्याची रचना अशी असावी की, नागपूरचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती प्रत्येक अभ्यागताला अनुभवता यावी.
Chandrashekhar Bawankule : घरकुल लाभार्थ्यांसाठी न्यू सँड पॉलिसी
स्पेन-भारत मैत्रीचा प्रभाव
हे केंद्र आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज, पर्यावरणपूरक आणि दृष्यदृष्ट्या आकर्षक असावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. या केंद्रात प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जागतिक परिषदांचे आयोजन होऊ शकेल. ज्यामुळे नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजेल. या करारावेळी स्पेनचे राजदूत जुआन अँटेनियो यांनी भारत आणि स्पेनमधील वाढत्या मैत्रीचे कौतुक केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्यातील सौहार्दामुळे दोन्ही देशांमधील संबंध दृढ होत आहेत. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे जीवन समृद्ध करत आहे. महाराष्ट्र, विशेषतः नागपूर, यात आघाडीवर आहे. त्यांनी मुंबईला दक्षिण आशियाचे पावरहाऊस संबोधत महाराष्ट्राचा गौरव केला.
फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, पायोनियर एक्झिबिशन अँड कॉन्व्हेन्शन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अरोरा, उपाध्यक्ष जीत अरोरा आणि नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर उपस्थित होते. या कराराचे आदान-प्रदान करताना नागपूरच्या विकासाचा एक नवा टप्पा सुरू झाला आहे. हे कन्व्हेन्शन सेंटर नागपूरच्या विकासाला नवी दिशा देणार आहे. यामुळे शहरात पर्यटन, व्यवसाय आणि सांस्कृतिक आदान-प्रदानाला चालना मिळेल. नागपूर आधीच मेट्रो, आयटी हब आणि आशियातील सर्वात लांब पूल यामुळे ओळखले जाते. आता या कन्व्हेन्शन सेंटरमुळे शहर जागतिक नकाशावर आणखी ठळकपणे झळकेल. देवाभाऊंच्या या प्रयत्नांमुळे नागपूर केवळ महाराष्ट्राची उपराजधानीच राहणार नाही, तर जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
