
जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेत केंद्र सरकारने सामाजिक समतेच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. ही दशकांपासून प्रलंबित असलेली मागणी आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात प्रत्यक्षात उतरली असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भारताच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडणारा निर्णय घेत मोदी सरकारने देशवासीयांची एक दीर्घकालीन मागणी पूर्ण केली आहे. जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना याला देशासाठी ऐतिहासिक आणि सुवर्ण दिन, असे गौरवले आहे.
बावनकुळे म्हणाले, आज देशासाठी एक सुवर्ण आणि ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मागणी अनेक दशकांपासून सातत्याने केली जात होती. पंतप्रधान मोदींनी ती पूर्ण करून देशवासीयांच्या मनातील आवाजाला प्रतिसाद दिला आहे. ते पुढे म्हणाले की, याआधी फक्त अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर असा एकूणच वर्गवारीनुसार जनगणना केली जात होती. मात्र आता एससी, एसटीसह सर्व इतर जातींची स्वतंत्रपणे जनगणना केली जाईल. ही मागणी ओबीसी आंदोलन, मराठा आंदोलन तसेच विविध समुदायांच्या चळवळींमधून वारंवार मांडली जात होती.

मोदीं सरकारने केलं पूर्ण
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी काँग्रेसवरही टीका करत म्हणाले, काँग्रेसने कधीच जातनिहाय जनगणनेला गांभीर्याने घेतले नाही. अनेक दशकं सत्ता भोगूनही त्यांनी ही मागणी सातत्याने नाकारली. पण आज मोदी सरकारने तीच मागणी मान्य करून समाजात समतेचा नवा अध्याय लिहिला आहे. ज्या समाजघटकांना आजवर सरकारी योजनांचा लाभ मिळाला नाही, त्यांनाही आता योजनांचा लाभ मिळेल. समाजातील असंतुलन दूर होईल आणि सर्व घटकांना न्याय मिळेल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, हा दौरा आधीच नियोजित होता. यात काहीच नवीन नाही. मोदीजींना मुंबईकरांचे प्रेम आणि पाठिंबा नेहमीच लाभलेला आहे. जातनिहाय जनगणनेच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे केंद्र सरकारने एक मोठा राजकीय आणि सामाजिक पल्ला गाठला आहे. हा निर्णय समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणारा ठरेल, असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे.
विरोधकांची टीका
जातनिहाय जनगणनेवर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी जातीनिहाय जनगणनेला याआधी स्पष्टपणे विरोध केला होता. मात्र, आज अचानक असा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारची निवडणूक जाहीर होत आहे, हे लक्षात घेता ही घोषणा केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. जातीनिहाय जनगणना ही केवळ आकड्यांची मोजणी नसून, ती प्रत्येक घटकाच्या हक्काची आणि संधीची मोजणी आहे. ही जनगणना निर्णायक ठरू शकते. पण केवळ तेव्हाच, जेव्हा ती प्रामाणिकपणे आणि पूर्ण पारदर्शकतेने राबवली जाईल, असे म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.