
गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर मंजुरी मिळाली असून, हा प्रकल्प विदर्भाच्या विकासाला नवी गती देणार आहे. तत्कालीन खासदार सुनिल मेंढे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 4819 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे.
गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास अखेर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. हा 4819 कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प विदर्भाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला गती देणारा ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी तत्कालीन खासदार सुनिल मेंढे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या कार्यकाळातच या प्रकल्पाच्या DPR (Detailed Project Report) ला मंजुरी मिळाली होती.

प्रकल्पामुळे 240 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार असून, उत्तर आणि पूर्व भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या रेल्वे वाहतुकीत मोठी सुधारणा होणार आहे. विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना याचा थेट लाभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी सुनिल मेंढे यांनी सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प आज प्रत्यक्षात येत आहे. त्यामुळे क्षेत्रातील जनप्रतिनिधी आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सुनिल मेंढे यांचे अभिनंदन केले आहे.
मोलाचा वाटा
वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गालाही नुकतीच मंजुरी मिळाल्याने गडचिरोली हा उद्योग आणि पोलाद निर्मिती क्षेत्रासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. खनिज, कोळसा, मॅंगनीज आणि पोलाद मालवाहतुकीला गती मिळेल, परिणामी स्थानिक उद्योगांना मोठा फायदा होईल. विदर्भातील ताडोबा आणि इतर वन्यजीव पर्यटन स्थळांना यामुळे चालना मिळेल. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात खनिज आणि औद्योगिक मालवाहतूक सुलभ होणार आहे. गोंदिया हा आधीच रेल्वे दृष्टीने महत्त्वाचा केंद्र आहे, आणि या प्रकल्पामुळे तो आणखी बळकट होणार आहे.
मंत्रिमंडळाचे आभार
या ऐतिहासिक प्रकल्पाच्या मंजुरीनंतर सुनिल मेंढे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. विदर्भाच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला असून, हा प्रकल्प संपूर्ण क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देईल.