महाराष्ट्र

अकोल्यात राज्यपाल C. P Radhakrishnan यांचा दौरा तरीही शेतकरी प्रतीक्षेत 

कृषिमंत्री Manikrao Kokate यांच्याकडूनही कोणतीच मोठी घोषणा नाही 

Post View : 26

Author

राज्यपाल आणि कृषिमंत्र्यांचा अकोल्यात दौरा पार पडला. या दौऱ्यादरम्यान मोठ्या घोषणेची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु असे काहीच न झाल्याने, शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार, असे दिसत आहे. 

अकोला येथे 5 फेब्रुवारी बुधवार रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 39 वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभामध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी पदवीधरांनी शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधन यांचा वापर शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी करावा, असे प्रतिपादन विद्यापीठ कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले आहे. यावेळी विविध विद्याशाखांच्या स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, ज्ञान मिळवणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला अधिकाधिक प्रगत करण्याची जबाबदारी नवपदवीधरांना पार पाडायची आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीजनिर्मिती, पशुधन विकास, आदर्श ग्राम प्रकल्प अशा उपक्रमांबरोबरच नवनव्या अभ्यासक्रमातून अनेक विद्याशाखांचा विकास केला आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी C.P Radhakrishnan ठरतील का तारणहार ?

महाराष्ट्राची उल्लेखनीय प्रगती

राज्यपाल पुढे म्हणाले की, ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची झेप जगभरात चमकदार आहे. औद्योगिक क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रातही तितकीच उल्लेखनीय प्रगती करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्ती, त्याचे उपयोजन व करावयाचे कार्य याबाबत निश्चित ध्येय ठरवून त्यानुसार वाटचाल करावी.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, जगभरात विविध क्षेत्रांत अनेकविध बदल होत आहेत. त्यानुसार कृषी क्षेत्रातही बदल घडवणे आवश्यक आहे. शेतीच्या उत्पादनखर्चात कपात व उत्पन्नात वाढ, यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासन पाऊले उचलत आहे. ‘एआय’सारख्या नवतंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.

अनेक बाबी आवश्यक

यावेळी अशोक दलवाई म्हणाले की, शाश्वत विकासासाठी कृषी उत्पादन प्रणालीची पुनर्रचना करतानाच कृषी पर्यावरणशास्त्र आणि सेंद्रिय शेतीची सांगड घातली पाहिजे. जैवविविधतेची जपणूक, विषमुक्त व सुरक्षित अन्ननिर्मिती, मृद संवर्धन, जलसंवर्धन होणे आवश्यक आहे. एकविसाव्या शतकातील संशोधनाची दिशा पर्यावरण संवर्धक असावी, असे आवाहन दलवाई यांनी केले.

कुलगुरू डॉ. गडाख यांनी प्रास्ताविकास विद्यापीठातील उपक्रमांची माहिती दिली. समारंभात विविध विद्याशाखांच्या एकूण 4 हजार 40 स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या. 25 स्नातकांना कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी आदी विषयांतील पीएचडी प्रदान आहे.

शेतकऱ्यांना होती अपेक्षा

जिल्ह्यात राज्यपाल सी.पी राधाकृष्णन आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा दौरा पार पडला. या दौऱ्यादरम्यान राज्यपाल किंवा कृषिमंत्री काहीतरी मोठी घोषणा करतील, अशी विदर्भातील शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु शेतकऱ्यांच्या मागण्यानुसार कोणतीच मोठी घोषणा झाली नाही. त्यामुळे गर्भातील शेतकऱ्यांना अजून किती प्रतीक्षा करावी लागणार, असे बोलले जात आहे.

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष अशोक दलवाई, कुलगुरू डॉ. शरद गडाख, आमदार अमोल मिटकरी, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल. संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, जनसंपर्क अधिकारी किशोर बिडवे, डॉ. नितीन कोष्टी आदी उपस्थित होते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!