सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी प्रशासनाला सजगतेचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सव, कावड यात्रा आणि मोहरम लक्षात घेता शिस्तीचा शंखनाद वाजवत सुरक्षा व्यवस्थेचा रोडमॅप तयार करण्याचे निर्देश दिले गेले.
सणासुदीचे दिवस जवळ येत असताना, अकोल्यातील कायदा-सुव्यवस्थेवर वादळापूर्वीची शांतता आहे. पण आता या शांततेला सजगतेचे कवच मिळाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी अकोल्यात गुन्हेगारीला रोखण्यासाठी आणि आगामी सणासुदीचे वातावरण सौहार्दपूर्ण राखण्यासाठी प्रशासनाला थेट आदेश दिले आहेत. पोलीस दल, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सजगतेचा मंत्र देताना, त्यांनी जिल्ह्यात ‘कायदा-सुव्यवस्थेचा रक्षणछत्र’ उभारण्याचे सूचित केले आहे.
गणपती उत्सव, कावड यात्रा, मोहरम, ऋषिपंचमी, चातुर्मास, या एकापाठोपाठ येणारे सण आणि त्यानिमित्ताने होणारी मोठी गर्दी. यात जराही ढिलाई झाली तर शांतता बिघडू शकते. याची जाणीव करून देत फुंडकरांनी सुरक्षेच्या मोर्चात कसलीही त्रुटी न ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. अकोट, बार्शीटाकळी, मूर्तिजापूरसारख्या भागांत कावड यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचतो, आणि त्यामुळेच पोलिसांची उपस्थिती, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन सुविधा यासाठी विशेष यंत्रणा तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हालचालींवर लक्ष
याच पार्श्वभूमीवर खासदार अनुप धोत्रे आणि अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी प्रशासनाशी समन्वय साधून आधीच पत्रव्यवहार करत खबरदारीच्या उपाययोजनांवर भर दिला होता. त्यावर आता पालकमंत्र्यांनी शिक्कामोर्तब करत यंत्रणेला वेळेत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. यासोबतच, शहरात काही भागांत वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रकार आणि असामाजिक प्रवृत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. “सण आनंदाने साजरे व्हावेत, पण सुरक्षा ही पहिली प्राथमिकता असावी,” असा स्पष्ट इशारा देत पालकमंत्र्यांनी पोलिसांनी रात्रंदिवस गस्त, सीसीटीव्ही प्रणाली, स्थानिक मोहल्ला समित्यांशी संवाद या गोष्टींना गती देण्याचा आदेश दिला आहे.
Sanjay Khodke : नदीच्या प्रवाहात अमरावतीलाही हवं न्यायाचं पाणी
शिवभक्तांपासून गणेश भक्तांपर्यंत, जैन समाजाच्या धार्मिक परंपरांपासून मुस्लिम बांधवांच्या मोहरमपर्यंत, सर्वच धर्मीयांच्या श्रद्धेला सन्मान देत कोणतीही गडबड, गोंधळ अथवा अडचण होऊ नये, यासाठी उपाययोजना राबवण्यावर भर दिला जात आहे. ‘कायद्याचा वचक आणि श्रद्धेचा सन्मान’ या दोन ध्रुवांमध्ये समतोल राखत अकोल्यात ‘ऑपरेशन सजग’ सक्रिय झाले आहे. स्थानिक पोलीस व प्रशासन यासाठी आराखडे तयार करत असून, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर, आपत्कालीन मदत केंद्रांची निर्मिती, आणि जमाव नियंत्रणासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सूचित केले आहे.