
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक पावलं उचलत सिंधू पाणी करार रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर हाफिज सईदचा धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तणाव अधिक गडद झाला आहे.
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर आणि निर्णायक पावले उचलली आहेत. या हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून केंद्र सरकारने तातडीने कारवाई करत भारत-पाकिस्तानमधील सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केला आहे. यानंतर भारत-पाक संबंध पुन्हा एकदा तणावाच्या कड्यावर पोहोचले आहेत.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून भारताला थेट धमकावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचा एक धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून हाफिज सईदने पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून गंभीर इशारा दिला आहे. त्यामध्ये तो म्हणतो, जर तुम्ही पाकिस्तानचे पाणी थांबवले, तर आम्ही तुमचा श्वास थांबवू. खोऱ्यांमध्ये रक्त वाहेल.
सीमा बंदी
धमकीचा व्हिडिओ पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या मदतीने सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये हाफिज सईद मोदी सरकारवर टीका करत म्हणतो, तुम्ही बांगलादेशात ढाका विद्यापीठात म्हणालात की पाकिस्तान आम्ही तोडला. जर तुम्ही असे बोलाल, तर आम्हीही बोलू. तुम्ही धरणं बांधून आमचं पाणी अडवण्याचा विचार करत आहात. पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याचा डाव आखत आहात. जर पाणी थांबवले, तर आम्ही तुमचा श्वास थांबवू, असे या व्हिडिओत म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सिंधू नदी पाणी वाटप करार पूर्णतः रद्द करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील लष्करी, नौदल आणि हवाई दल सल्लागारांना एका आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील तज्ञांना परत बोलावण्यात आले आहे. अटारी-वाहगा सीमा बंद करण्यात आली आहे. भारतकडून दबाव वाढवल्यानंतर पाकिस्ताननेही प्रतिउत्तर देत भारतीय विमानांसाठी आपली एअरस्पेस बंद केली आहे.
Chandrashekhar Bawankule : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सावली नको
संघर्ष टोकावर
सिंधू पाणी करार 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्व बँकेच्या मध्यस्थीने झाला होता. या करारानुसार भारताने सिंधू, झेलम आणि चेनाब या नद्यांचे पाणी पाकिस्तानला वापरण्याची मुभा दिली होती. तर सतलज, बियास आणि रावी या नद्या भारतासाठी राखून ठेवल्या होत्या. गेल्या काही दशकांपासून या करारावरून वाद निर्माण होत आले आहेत. विशेषतः जेव्हा भारत जम्मू-कश्मीरमध्ये धरणं आणि सिंचन प्रकल्प सुरू करतो, तेव्हा पाकिस्तानने वारंवार आक्षेप घेतला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या या कठोर निर्णयांनी दोन्ही देशांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. हाफिज सईदसारख्या दहशतवाद्याच्या धमक्यांमुळे वातावरण आणखी चिघळले आहे. दोन्ही देश आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपले आहेत. भारताने घेतलेले हे पावलं केवळ पाकिस्तानला कठोर संदेश देणारेच नाही, तर देशाच्या सुरक्षा आणि स्वाभिमानासाठी अत्यंत गरजेचेही आहेत.