
धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये काँग्रेसने शांती आणि सौहार्दाचा संदेश दिला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात सद्भावना शांती मार्चचे आयोजन करण्यात आले.
राजकारणातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा विभाजनाच्या रेषा गडद होत चालल्या आहेत.अशा काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सामाजिक समतेची धगधगती मशाल उचलत नागपूरच्या रस्त्यावर शांततेचा एल्गार पुकारला. धार्मिक तेढ, असहिष्णुतेची वाफ, आणि अस्थैर्याच्या वातावरणात काँग्रेसने घेतलेले हे पाऊल म्हणजे राजकारणाच्या नव्या दिशा अधोरेखित करणारा ठसा ठरतो.

नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी उसळलेल्या धार्मिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, राज्यात सामाजिक सलोखा टिकवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने सद्भावना शांती मार्चचे आयोजन केले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात झालेला हा मार्च सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरला आहे. त्याला पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला.
जनतेत सकारात्मक ऊर्जा
घडलेल्या घटनेनंतर काँग्रेसने वरिष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून नागपूरच्या घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रशासनाने परवानगी नाकारल्याने काँग्रेसने यास तीव्र विरोध नोंदवत राज्यपालांच्या माध्यमातून आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली. सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई येथील राजभवनात भेट देत सविस्तर निवेदन सादर केले.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथून सुरू झालेल्या सद्भावना शांती मार्चने शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांतून वाटचाल करत राजवाडा पॅलेस येथे समारोप केला. विविध वयोगटांतील कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि स्थानिक नागरिकांनी या मार्चमध्ये सहभाग घेत शांततेचा झेंडा फडकावला. नागपूरकरांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत सौहार्दाचा झरा अधिक खोलवर रुजवला.
नव्या नेतृत्वाची उजळणी
हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या नव्या जनआंदोलनाचे मूर्त स्वरूप ठरत आहेत. त्यांचे नेतृत्व प्रस्थापित राजकारणाच्या चौकटीबाहेर विचार करणारे आहे. सामाजिक विषयांवर रस्त्यावर उतरून दिला जाणारा लढा त्यांच्या भूमिकेला अधिक विश्वासार्ह बनवतो. त्यांच्या कार्यशैलीत प्रशासनावर दबाव आणण्याची ताकद असून, जनतेच्या प्रश्नांवर केंद्रित राहण्याची चिकाटीही आहे.
महाराष्ट्र काँग्रेससाठी हर्षवर्धन सपकाळ हे सध्या नव्या आशेचे प्रतीक ठरत आहेत. सामाजिक सलोखा, संवेदनशील प्रशासन आणि सक्रिय कार्यसंस्कृती या तत्त्वांवर आधारित त्यांची राजकीय दिशा आगामी काळात पक्षासाठी महत्त्वाची ठरणार आहे. नागपूरच्या घटनांवर त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यावर उभा केलेला संयमशील संघर्ष हा त्यांच्या नेतृत्वाचे वैचारिक आणि भावनिक बळ अधोरेखित करणारा ठरतो. त्यांच्या हाच प्रयत्न महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय नकाशावर नवा शांतीदूत तयार करत आहे.