मराठी ही भाषा नव्हे, ती महाराष्ट्राच्या मणक्याची शान आहे. हिंदी सक्तीला विरोध करत काँग्रेसनं मराठी अस्मितेचा बुलंद एल्गार दिला आणि हिंदी सक्तीवरून सरकारचा विरोध केला.
मराठी म्हणजे केवळ एक भाषा नाही, तर ती महाराष्ट्राच्या मातीचा गंध, इथल्या जनतेचा आत्मा, आणि अस्मितेचा कणा आहे. मराठीवर आलेला कुठलाही आघात हा केवळ भाषेचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र धर्मावरचा घाला आहे. याच भावनेला शब्द देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मराठीला हात लावाल तर खबरदार, असा इशारा सरकारला दिला.
मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘आम्ही मराठी, आम्ही भारतीय’ या विशेष मराठी भाषा कार्यशाळेत सपकाळ बोलत होते. या कार्यशाळेत बोलताना सपकाळ यांनी स्पष्ट सांगितले की, काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे. भाजप सरकार विविधतेला नष्ट करत ‘वन नेशन वन लँगवेज’सारखी कल्पना बळजबरीने लादू पाहत आहे. ही संकल्पना सरसंघचालक गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकातून उगम पावली आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
अस्तित्वासाठी लढा
सपकाळ म्हणाले की, भाजप व संघ परिवार देशातील संविधानाला मानत नाहीत. त्यांच्या दृष्टिकोनात ‘हिंदी-हिंदू-हिंदुस्थान’ हा अजेंडा आहे. मराठीसारख्या प्रादेशिक भाषांवर अन्याय करणं हे याच अजेंड्याचा भाग आहे. त्यामुळे मराठीच्या अस्तित्वासाठी हा लढा वैचारिक असून, संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. मीरा रोडसारखा संवेदनशील भाग निवडण्यामागेही हेतू आहे, असं सांगत सपकाळ म्हणाले, इथे मतभेद, भाषावाद, आणि प्रांतवादाचे वातावरण निर्माण होऊ पाहतेय. आम्ही येथे येऊन स्पष्ट भूमिका मांडतो आहोत की, ही लढाई कुणा विरुद्ध नसून, मराठीच्या अस्तित्वासाठी आहे.
Ashok Uike : गडचिरोलीतील विद्यार्थ्यांमध्ये मुखकर्करोगाचा उद्रेक
भाषावाद उकरून काढला
प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी यावेळी भाजपवर टीका करताना म्हटले की, राम मंदिराचा मुद्दा संपल्यावर आता भाजप जात, धर्म व भाषा यावरून जनता भडकवत आहे. देशाची संपत्ती विकली जात असताना, बेरोजगारी, महागाई आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपनं भाषावाद उकरून काढला आहे. मराठी भाषा विभागाचे डॉ. दीपक पवार यांनी तिसऱ्या भाषेच्या सक्तीवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, जर पहिलीपासून हिंदी शिकवली गेली, तर मराठीची जागा कमी होईल आणि ती हिंदीची पोटभाषा होईल. त्यांनी डॉ. नरेंद्र जाधव समितीवरही प्रश्न उपस्थित केले आणि जीआर रद्द करूनही धोका कायम असल्याचं स्पष्ट केलं.
भाषेचा कोंडमारा
काँग्रेस नेते दीपक पवार यावेळी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मुंबईबद्दल नाही, MMRDA बद्दल बोलतात. या शब्दांच्या पाठीमागे एक गुप्त अजेंडा आहे. मुंबईच्या आसपासचा प्रदेश वेगळा राज्य म्हणून उभा करणं, आणि त्या माध्यमातून मराठी भाषेचा कोंडमारा करणं. या संपूर्ण कार्यक्रमातून काँग्रेसने एक ठाम संदेश दिला, आम्ही कोणत्याही भाषेविरोधात नाही, पण मराठीच्या हक्कावर अन्याय सहन केला जाणार नाही. आम्ही मराठी, आम्ही भारतीय, या घोषणांनी परिसर दणाणून गेला.