महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : पैशाअभावी गेले प्राण, रुग्णालयासह सरकारवर आरोपांचे बाण 

Congress : प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धरले धारेवर 

Author

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दाखविलेल्या अमानुषतेवरून राज्यात वातावरण तापत आहे. रुग्णालय प्रशासनासह विरोधक सरकारलाही धारेवर धरत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे. 

पुण्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तनिषा भिसेचा मृत्यूनंतर गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत. केवळ पैशाअभावी उपचार नाकारल्याने तनिषा भिसे या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ही केवळ वैद्यकीय दुर्लक्षाची बाब नसून सदोष मनुष्यवध असल्याचा आरोप करत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर व रुग्णालय प्रशासनावर सडकून टीका केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, “तनिषा भिसेच्या मृत्यूनंतर तत्काळ गुन्हा दाखल व्हायला हवा होता. मात्र सरकारकडून मुद्दाम वेळकाढूपणा केला गेला आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे निष्काळजीपणाच नव्हे तर एक प्रकारचा कट वाटतो. सपकाळ पुढे म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने धर्मादाय रुग्णालय म्हणून जी जबाबदारी घेणे अपेक्षित होती, ती पूर्णतः फोल ठरली आहे. पैशाअभावी रुग्णाला उपचार नाकारणे ही मानवतेच्या विरोधातली गोष्ट आहे. अटी व शर्तींचा भंग करून रुग्णालयाने एक बळी घेतलेला आहे. यामुळे रुग्णालयाचे संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करून रुग्णालय सरकारी ताब्यात घ्यावे, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

कारवाईची मागणी

प्रकरणात डॉ. केळकर यांचा सहभाग स्पष्ट दिसतो. त्यांनी सुरुवातीला फोन उचलला पण नंतर पूर्णतः दुर्लक्ष केले. इतक्या गंभीर परिस्थितीत जबाबदार व्यक्ती असे वागू शकत नाही. डॉ. केळकर यांचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासण्यात यावा. त्यांच्यावर कटात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल व्हावा. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीमार्फत करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

Parinay Fuke : जनतेच्या मनात ‘हिट’, आरोग्याच्या बाबतही अगदी ‘फिट’

घटनेला एवढे दिवस झाले, पण अद्याप कोणत्याही दोषींवर ठोस कारवाई झालेली नाही. सरकार फक्त वेळ मारून नेत आहे. रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांना जराही शरम वाटत नाही, ही बाब अमानुष आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना असे भीषण प्रकार घडत असतील, तर तो एक शरमेचा विषय आहे. संपूर्ण राज्याला हादरवणारी ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. भिसे कुटुंबियांना त्यांनी सांत्वनपर भेट दिली, अशी माहितीही त्यांनी दिली.

तनिषा भिसेच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष झगडत राहील, असे आश्वासनही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. “दोषींना शिक्षा होईपर्यंत आम्ही थांबणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!