महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रियेतील गोंधळ आणि मतदारयादीतील घोटाळ्यांवर काँग्रेसने ठाम भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पारदर्शकतेसाठी काँग्रेसचा निर्धार व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक टीका केली आहे.
महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रियेवर गंभीर संशयाचे सावट आहे. या संपूर्ण गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे थेट धाव घेतली आहे. मतदारयादीतील विसंगती, मतचोरी आणि कारभारातील अपारदर्शकता हे मुद्दे आता काँग्रेसच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या प्रकरणात दाखवलेला सक्रिय सहभाग हा लोकशाहीच्या शुद्धतेसाठी लढण्याचा एक ठाम संकल्प आहे. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठामपणे स्पष्ट केले आहे.
राजकारणातील सौम्य भाषेऐवजी थेट आणि ठसक्याने बोलणारे सपकाळ यांनी स्पष्ट केलं की, निवडणूक आयोगाकडे गेलेले शिष्टमंडळ हे पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर उभे आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यसमिती सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळातील आक्रमक नेता विजय वडेट्टीवार, तसेच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा सहभाग होता. या भेटीचा हेतू आरोप करणे नव्हता. तर मतदारयादीतील घोळ उघडकीस आणणे हा होता. राहुल गांधींनी राष्ट्रीय पातळीवर या मतचोरीचा पर्दाफाश करून महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांतील गैरप्रकार समोर आणले आहेत. काँग्रेसने या घोटाळ्याचे पुरावे संबंधित घटक पक्षांनाही सुपूर्द केले आहे. आयोगालाही याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Local Body Election : जागावाटपाच्या जुगलबंदीत कलहाचे काळे ढग
इंडिया आघाडीवरील भूमिका
इंडिया आघाडीमध्ये नव्या पक्षांचा समावेश हा चर्चेचा विषय असला तरी काँग्रेसने याबाबत संयमित भूमिका घेतली आहे. मनसेकडून आघाडीत सहभागी होण्याचा कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही, असे सपकाळ यांनी सांगितले आहे. इंडिया आघाडीमध्ये कोणत्याही नव्या पक्षाचा प्रवेश हा एकत्रित चर्चेने ठरतो, या भूमिकेने त्यांनी राजकीय संयम आणि परिपक्वतेचा उत्तम आदर्श ठेवला आहे.
सपकाळ यांनी एका वेगळ्या मुद्द्यावरही प्रहार केला. सेन्सॉर बोर्डाची परवानगी असतानाही ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवणाऱ्या संघटनांवर त्यांनी जोरदार टीका केली. संस्कृतीच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्यांना त्यांनी ‘लोकशाही संस्कारांचा विसर पडलेला’ असा शब्दप्रहार केला. या संघटनांनी चित्रपटाचं नाव ‘मनाचे श्लोक’ न ठेवता ‘मन की बात’ करावं, असा उपरोधिक टोला लगावून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या राजकीय भूमिकेलाच आरसा दाखवला.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या या निवेदनाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा चर्चा पेटवली आहे. त्यांनी केलेले वक्तव्य निवडणूक प्रक्रियेच्या शुद्धतेसाठी लढणाऱ्या विचारवंत राजकारण्याच्या जबाबदारीतून उमटल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्यांच्या भाषेतली धार आणि संतुलन, दोन्हींचा संगम महाराष्ट्रातील राजकारणाला नवा आत्मविश्वास देणारा ठरत आहे.