महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा फटका नाना पटोले यांना मिळाला. पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे राजकीय उलथापालथ होत असताना, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. टिळक भवन येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात सपकाळ यांनी 18 फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला. भल्या भल्या मातब्बरांना डावलून पक्षश्रेष्ठींनी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. राहुल गांधी यांच्यातर्फे सकाळ यांना मिळालेले हे बक्षीस आहे, अशी चर्चाही काँग्रेसमध्ये सुरू आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीने काँग्रेसच्या गोटात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना ही निवड अनपेक्षित वाटली असून, काहींनी याबाबत थेट नाराजी दर्शवली आहे. एवढेच नव्हे, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आश्चर्य व्यक्त करत या निर्णयाबाबत आपल्या भावना स्पष्ट केल्या. त्यामुळेच आजच्या समारंभाला काही मोठ्या नेत्यांनी दूर राहणे पसंत केले. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मात्र आपण व्यक्तिगत कामानिमित्त अनुपस्थित असल्याचे स्पष्ट केले आहे.
ढय्या लागली.. Parunay Fuke यांच्याशी दगा करणाऱ्यांना आता शिक्षा
बुलढाणा ते दिल्ली
नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा मतदारसंघाचे माजी आमदार असून, काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून त्यांनी काम केले असून, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कार्यगटाचे ते सक्रिय सदस्य होते. राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी देशभरातील ग्रामीण राजकारण आणि संघटनात्मक बांधणीसाठी मोठे योगदान दिले आहे. उत्तराखंड आणि पंजाबसारख्या महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या यशासाठी झटले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द विद्यार्थी चळवळीतून सुरू झाली. एनएसयुआय आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नेतृत्वकौशल्याची चुणूक दाखवली. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. विशेषतः वऱ्हाड आणि संपूर्ण महाराष्ट्रात युवक काँग्रेसला मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली सपकाळ थेट राहुल गांधी यांच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांची राहुल गांधी ब्रिगेडमध्ये वर्णी लागली. जिथे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्यासोबत त्यांनी काँग्रेसच्या युवा नेतृत्वाचा एक विश्वासार्ह चेहरा म्हणून स्वतःला सिद्ध केले.
पंचायत ते विधीमंडळ
सुरुवातीला जिल्हा परिषदेचे सदस्य आणि नंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर, हर्षवर्धन सपकाळ आमदार झाले. राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी उल्लेखनीय काम केले. अखिल भारतीय पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी देशभरातील पंचायत राज संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी योगदान दिले. त्यांचा अभ्यासू दृष्टिकोन आणि आक्रमक राजकीय शैली यामुळे ते काँग्रेसच्या विधिमंडळातील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात.
2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. काँग्रेसने त्या वेळी अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली एक निवडणूक मोहीम आखली होती, आणि हर्षवर्धन सपकाळ यांना सहप्रभारी म्हणून या मोहिमेचा कणा बनवण्यात आले होते. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि रणनीतीमुळे गुजरात निवडणुकीत काँग्रेसला चांगली लढत देता आली.
कलम 370, राम मंदिर, तीन तलाकचे कनेक्शन असलेले ज्ञानेश मोठ्या पदावर
गांधींच्या विश्वासातील नेते
हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक रणनीतीत त्यांची विशेष पकड असल्याने, त्यांची काँग्रेस पक्षात मोठी पत निर्माण झाली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळेच त्यांना आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला राज्यात नवसंजीवनी मिळेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या परयत्नांमुळे कार्यक्रमाला काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते.
